CoronaVirus : कोल्हापुरातील थ्री स्टार हॉटेल कोरोनाबाधित रुग्णांसाठी खुलं; सिद्धार्थ शिंदेंचं असंही समाजकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 01:22 PM2020-03-28T13:22:47+5:302020-03-28T13:23:41+5:30
होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात हे हॉटेल कीज सिलेक्ट कृष्णा इन आहे.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज यांच्या नगरीतील अर्थात कोल्हापुरातील एक तरुण उद्योजक समोर आला आहे. त्यांनी होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल गेल्या आठवड्यापासून खुलं केलं आहे. राज्यभर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रथम लक्षण असणाऱ्या रुग्णांना शासनाने होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी रुग्णालयात जागा नाही, त्यामुळे कोल्हापुरातील तरुण उद्योजक सिद्धार्थ शिंदे हे समोर आले आहेत. त्यांनी होम क्वारंटाईनची सुविधा नसणाऱ्या रुग्णांसाठी स्वतःचं थ्री स्टार कॅटेगिरीमधील हॉटेल खुलं केलं आहे. शहरातील ताराबाई पार्क परिसरात हे हॉटेल कीज सिलेक्ट कृष्णा इन आहे.
प्रसिद्ध लेखक रणजित देसाई यांचे नातू सिद्धार्थ शिंदे यांनी हे हॉटेल २०१३ मध्ये कोल्हापुरात सुरू केलं. हॉटेलचा व्यवसाय अत्यंत कुशल पद्धतीने सिद्धार्थ चालवतात. मात्र वडील, आजोबा यांच्यापासूनच घरामध्ये समाजकार्य करण्याची परंपरा आहे. हा वारसा सिद्धार्थ शिंदे पुढे चालवत आहेत. दोन महिन्यांपासून देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या रुग्णांना होम क्वारंटाईन ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अनेक रुग्णांना विविध कारणाने होम क्वारंटाईन करणं शक्य नसतं ही गरज ओळखून सिद्धार्थ शिंदे यांच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यांनी आपलं थ्री स्टार कॅटेगिरीमधील कीज सिलेक्ट कृष्णा इन् हॉटेल बंद करून या हॉटेलमधील २८ रुम या कोरोनाबाधित रुग्णांसाठी देण्याचे ठरविले.
ही कल्पना त्यांनी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर मांडली. त्यानंतर सर्व प्रशासकीय परवानगी घेऊन सिद्धार्थ यांनी आपलं हॉटेल होम क्वारंटाईनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी खुलं केलं. एकूण २२ व्यक्ती सध्या या हॉटेलमध्ये गेल्या आठवड्यापासून वास्तव्य करत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण या हॉटेलमध्ये येणार असल्याचे कळताच हॉटेलमध्ये काम करणारे अनेक जण नोकरी सोडण्याच्या तयारीला लागले. मात्र सिद्धार्थनी त्यांची समजूत काढली आणि आपल्या हॉटेलमध्ये २८ खोल्या या रुग्णांसाठी दिल्या. ज्यांना घरातून डबा येणं शक्य आहे, त्यांना घरातून जेवणाचे डबे येतात. मात्र ज्यांना जेवणाचे डबे येत नाहीत त्यांच्यासाठी चहा, नाष्टा आणि जेवणाची सोय सिद्धार्थ यांनी केली आहे.
सिद्धार्थ यांनी लंडनमध्ये उच्चशिक्षण घेतलेलं आहे. नोकरीमध्ये मन रमलं नाही म्हणून त्यांनी हॉटेल व्यवसायाबरोबरच समाजप्रबोधनाचे काम कोल्हापुरात २००६ पासून सुरू केले आहे. ते भारतीय किसान संघाचे काम गेल्या काही वर्षांपासून करत आहेत. सध्या ते कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. सिद्धार्थ यांच्या या हॉटेलमध्ये यापूर्वीही अनेक मान्यवर राहिले आहेत. गायक कैलास खेर हे त्यांचे पहिले ग्राहक आहेत. माजी राष्ट्रपती आणि माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या भाची मिनू घोष, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, नटसम्राट चित्रपटाच्या चित्रीकरण प्रसंगी अभिनेते नाना पाटेकर, महेश मांजरेकर व सर्व तंत्रज्ञ हे येथेच राहायला होते. याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हेही सिद्धार्थ शिंदे यांच्या घरी राहिले आहेत.
------------------
"आपलं हे काम खूप छोटं असून आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण समाजसेवा करत असून यामध्येच आपणाला समाधान आहे."
- सिद्धार्थ शिंदे, मालक,
कीज सिलेक्ट हॉटेल कृष्णा इन, कोल्हापूर