Coronavirus Unlock : परिसर सील करण्यावरून वादावादी, बाजारगेट येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 10:40 AM2020-07-28T10:40:46+5:302020-07-28T10:43:38+5:30
महापालिका परिसरातील बाजारगेटमध्ये महापालिकेचे कर्मचारी परिसर सील करण्यासाठी गेल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. काहीवेळ वादावादी झाली.
कोल्हापूर : महापालिका परिसरातील बाजारगेटमध्ये महापालिकेचे कर्मचारी परिसर सील करण्यासाठी गेल्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. काहीवेळ वादावादी झाली.
शहरातील प्रभाग क्रमांक ३१ बाजारगेटमध्ये लोणार वसाहत, पापाची तिकटी, मराठा बँक समोर परिसरात मोठ्या संख्येने रुग्ण सापडले आहेत. लोणार गल्लीत तर दिवसात चोवीस रुग्ण आढळले. त्यामुळे महापालिकेने पूर्ण प्रभाग सील करण्याचा निर्णय घेतला तसेच स्थानिक नगरसेविकांनी सलग पाच दिवस प्रभाग लॉकडाऊन केला.
त्यामुळे सोमवारी शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय येथील महापालिकेतील कर्मचारी महापालिकेसमोरील बाजारगेट परिसर सील करण्यासाठी गेले होते. यावेळी येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला. गेली सात दिवस शहर लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहेत. पुन्हा रस्ता का बंद करता, तुमच्याकडे आदेश आहेत का, असे सवाल केले.
उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण यांनी करवीर प्रांताधिकारी यांचे आदेश आणून दाखविले. त्यानंतर वादावर पडदा पडला. गल्ली सील करण्यात आली. महापालिकेतील कर्मचाऱ्यांना काम करताना अशा अनेक अडचणी येत आहेत. लोकांच्या हितासाठीच निर्णय घेतले जातात. काहीवेळेस काही लोकप्रतिनिधी प्रभाग सील करताना अमूक ठिकाणाहूनच परिसर सील करा, असा दबाव टाकतात.