Coronavirus Unlock : लॉकडाऊन न पाळल्यास फौजदारी कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:13 AM2020-07-01T11:13:07+5:302020-07-01T11:15:56+5:30
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला.
कोल्हापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा फौजदारी कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी दिला.
कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन ३१ जूलैैपर्यंत वाढवले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी हा निर्णय मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला. यानुसार नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, दुकानदार व ग्राहकांमध्ये ६ फुटापेक्षा जास्त अंतर राखणे बंधनकारक असेल. लग्न सोहळ्यासाठी व अंत्यसंस्कारासाठी ५० नातेवाईकांना परवानगी असेल.
दैनंदिन पास ३१ जुलैपर्यंत
कोल्हापूरला लागून असलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना ये-जा करण्यासाठी आता ३१ जूलैपर्यंत दैनंदिन पास देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील आस्थापनांसाठी जिल्हा उद्योग केंद्र, सर्व शासकीय विभाग व बँंकांसाठी करवीर, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा आणि शाहूवाडीचे तहसिलदार, खासगी शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयांसाठी गट शिक्षणाधिकारी यांना पास देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.