Coronavirus Unlock : माहितीची सत्यता, विश्वासार्हतेसाठी मुद्रित माध्यमांवरच भिस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:19 PM2020-07-02T17:19:16+5:302020-07-02T17:21:40+5:30
लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे.
कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये माहिती मिळविण्यासाठी मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, वेब माध्यमांचा आधार घेण्यात आला; परंतु माहितीची सत्यता आणि विश्वासार्हता, आदींसाठी मुद्रित माध्यमांवरच लोकांची भिस्त आहे.
या काळात इतर माध्यमांना वेळ देण्याचे प्रमाण वाढले असले, तरी वस्तुनिष्ठ माहितीसाठी लोक मुद्रित माध्यमांचाच आधार घेत असल्याचे स्पष्ट झाले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाने केलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
या अध्यासनाच्या ह्यपी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमह्ण या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात हे सर्वेक्षण केले. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात माध्यमांच्या वापरासंदर्भातील प्रश्नावली ऑनलाईन भरून घेतली. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा राज्यांतील ३०० जणांनी ही प्रश्नावली भरून दिली. त्यांत गृहिणी, व्यापारी, अभियंते, विद्यार्थी, छोटे व्यावसायिक यांचा समावेश होता.
लॉकडाऊनच्या काळात विविध प्रसारमाध्यमांचा कशा पद्धतीने उपयोग केला जातो आहे, याचा अभ्यास अध्यासनाच्या वतीने या सर्वेक्षणातून करण्यात आला असल्याची माहिती या अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी दिली.
प्रश्नावलीच्या विश्लेषणानंतरचे निष्कर्ष
१) मुद्रित माध्यमे सर्वाधिक विश्वासार्ह असल्याचे मत ६९.३ टक्के उत्तरदात्यांनी नोंदवले. १९.६ टक्के लोकांनी इंटरनेट, मोबाईलवरील माहिती विश्वासार्ह आहे, असे म्हटले; तर, ८.१ टक्के जणांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील माहिती विश्वासार्ह वाटत असल्याचे मत व्यक्त केले. तीन टक्के लोकांना पारंपरिक माध्यमे विश्वासार्ह वाटतात.
२) माहिती मिळविण्यासाठी ६३.२ टक्के लोक मराठी वृत्तवाहिन्या पाहतात. हिंदी आणि इंग्रजी वृत्तवाहिन्या पाहणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. स्थानिक भाषेतील माध्यमे वापरणे सोयीचे असल्याने बहुतेक लोक मराठी वृत्तवाहिन्या पसंत करीत आहेत. लॉकडाऊनपूर्वी वृत्तवाहिन्या पाहण्याची वेळ कमी होती. लॉकडाऊनच्या काळात वृत्तवाहिन्या पाहण्यासाठी दर्शकांकडून अधिकचा वेळ दिला जात आहे.
३) लॉकडाऊनपूर्वी सोशल मीडियासाठी दिवसातील दोन ते चार तास वेळ देणाऱ्यांची संख्या २०.३ टक्के होती; पण लॉकडाऊनच्या काळात ही संख्या वाढून ३९.५ टक्के झाली. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियापैकी व्हॉट्सअॅपचा (५५.७ टक्के) वापर सर्वाधिक होत असल्याचे अभ्यासात दिसून आले.
वाचक, श्रोते, वापरकर्त्यांचा प्रतिसाद
पारंपरिक, मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमांना वाचक, श्रोते-दर्शक आणि वापरकर्ते कसा प्रतिसाद देतात, हे पाहणे या संशोधनाचे उद्दिष्ट होते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.