महापालिकेचे संपूर्ण कामकाज संगणकावर
By Admin | Published: January 2, 2016 08:29 AM2016-01-02T08:29:51+5:302016-01-02T08:33:07+5:30
आयुक्त : सहा महिन्यांत ‘ई आॅफिस’ संकल्पना
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सर्व विभागांचे कामकाज येत्या सहा महिन्यांत संगणकावरच सुरू होईल. कामकाजात सुलभता आणि गती येण्यासाठी ‘ई आॅफिस’ संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
महानगरपालिकेत एकाच कामाची फाईल अनेक विभागांत अनेक ठिकाणी फिरत असते. त्यामुळे कामाला उशीर होतो. कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे यापुढे कमीत कमी वेळेत काम पूर्ण होण्यासाठी आणि कामकाजात सुलभता निर्माण होण्यासाठी ‘ई आॅफिस’ संकल्पना राबविणे अपरिहार्य आहे म्हणूनच येत्या सहा महिन्यांत संपूर्ण कामकाज संगणकावर केले जाईल. राज्य सरकारच्या एनआयसी विभागाचे काही कर्मचारी मनपाच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘ई आॅफिस’ कामकाजाचे प्रशिक्षण देणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले. ( प्रतिनिधी )
मिळकतींचे सर्वेक्षण करणार
शहरातील सर्व मिळकतींचे यावर्षी शंभर टक्के सर्वेक्षण केले जाणार आहे. गेल्या पाच वर्षांत घरफाळ्यात वाढ करण्यात आली नाही, परंतु यंदा मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी १० आणि जास्तीत जास्त ४० टक्के अशी वाढ होईल. गावठाण क्षेत्रात ज्यांची घरे आहेत, त्यांचा घरफाळा तुलनेने अधिक होईल, उपनगरांतील मिळकतधारकांचा घरफाळा कमी प्रमाणात वाढेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
४नवीन वर्षात कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील. त्यासाठी २०१४ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार ज्यांच्या घरात शौचालये नाहीत, त्यांना ती बांधण्यासाठी आठ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असून, झोपडपट्टी परिसरात शौचालयांची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.