अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद वैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 03:37 PM2017-09-12T15:37:38+5:302017-09-12T15:37:38+5:30
जातीचा दाखला अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द करण्यात आलेल्या कोल्हापूरच्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद अबाधित राहिले आहे.
कोल्हापूर , दि. १२ : जातीचा दाखला अवैध ठरल्याने नगरसेवक पद रद्द करण्यात आलेल्या माजी महापौर अश्विनी रामाणे यांचे नगरसेवकपद अबाधित राहिले आहे.
जात पडताळणी समितीने अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिल्याने रामाणे यांचे नगरसेवकपद आता कायम राहिले आहे. यामुळे महानगरपालिकेने सुरु केलेली शासकीय मध्यवर्ती कारागृह प्रभागाची पोटनिवडणूक प्रक्रिया रद्द होणार आहे.
यासंदर्भातील प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर सुरु होईल. न्यायालयात रामाणे यांच्या बाजूने अॅड. तानाजी मातुगडे यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर कळंबा, रायगड कॉलनी परिसरात फटाके वाजवून रामाणे यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.
कोल्हापूरच्या माजी महापौर आणि काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी रामाणे यांचे नगरसेवक पद जानेवारी २0१७ मध्ये रद्द करण्यात आले होते. जातपडताळणी समितीने त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. जात पडताळीत त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्यानंतर कोल्हापूर पालिकेचे विभागीय आयुक्त पी.शिवशंकर यांनी नगरसेवक पद रद्द करण्याची कारवाई केली.
अश्विनी रामाणे यांचं नगरसेवक पद रद झाल्यानं काँग्रेसला कोल्हापूरमध्ये मोठा धक्का बसला होता. महापौरपदाच्या निवडणुकीत अश्विनी रामाणे यांनी बाजी मारली होती. त्यांनी भाजपच्या सविता भालकरांचा पराभव केला होता. मात्र, जातीचा दाखला अवैध ठरविल्यानंतर रामाणे यांचे नगरसेवक पदच रद्द झाले होते.