व्यापारी संकुल बांधणीत ठेकेदाराचा पालिकेला चुना

By admin | Published: February 3, 2016 12:44 AM2016-02-03T00:44:39+5:302016-02-03T00:53:13+5:30

फौजदारीची मागणी : दुकानगाळे ताब्यात देण्यास टाळाटाळ

The corporator chose the corporation to build a merchant package | व्यापारी संकुल बांधणीत ठेकेदाराचा पालिकेला चुना

व्यापारी संकुल बांधणीत ठेकेदाराचा पालिकेला चुना

Next

कोल्हापूर : हॉकी स्टेडियमच्या समोरील मध्यवर्ती व्यापारी संकुल आरक्षण क्षेत्रावरील बांधकामातील महापालिकेला देय असणारे दुकानगाळे व कार्यालय निर्धारित मुदत संपून गेल्यानंतरही ताब्यात दिलेले नाहीत. त्यामुळे करारातील अटींचा भंग केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर महानगरपालिकेने तत्काळ फौजदारी करावी, अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे व वृषाली कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. संबंधित ठेकेदार या जागेवर अतिरिक्त टीडीआर वापरत असून त्यालाही तत्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात माहिती अधिकारात प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे भूपाल शेटे व वृषाली कदम यांनी पत्रकारांना सादर केली. महानगरपालिकेने हॉकी स्टेडियमच्या समोरील बाजूस रि.स.नं. ७०९/अ बी वॉर्ड येथील ८०७६.१० चौरस स्क्वेअर मीटर इतक्या जागेवर आरक्षण (क्रमांक २३८) ठेवण्यात आले होेते. या जागेचे मूळ मालक अजित विश्वंभर पंडित हे असून त्यांच्यावतीने बांधकाम व्यावसायिक अमृतलाल खेतमल शाह यांनी वटमुखत्यारपत्र घेतले आहे. या मिळकतीवर शहराची सुधारित विकास आराखड्यानुसार आरक्षित क्षेत्र ८०७६.१० चौ. मीटर क्षेत्राच्या मिळणाऱ्या एफएसआयच्या १५ टक्के एफएसआय म्हणजेच ९०८.५० चौरस मीटर क्षेत्रात ठेकेदाराने महानगरपालिकेला चार मजली इमारतीत दुकानगाळे व कार्यालय बांधून द्यायचे होते. तसा करारही झाला आहे. १५ मार्च २०१२ पासून पुढे ३६ महिन्यांत म्हणजे १५ मार्च २०१५ पर्यंत बांधण्यात आलेली सर्व इमारत अद्ययावत करून ठेकेदाराने महानगरपालिकेच्या ताब्यात द्यायची होती. आता ही मुदत संपून दहा महिने झाले आहेत. ठेकेदार शहा यांनी महापालिकेला द्यायच्या दुकानगाळ्याकरिता नाममात्र कॉलम टाकून इमारत उभी केली असली तरी ती पूर्ण झालेली नाही. मनपाला देण्यात येणाऱ्या इमारतीचे कॉलम, फुटिंग याचे काम अतिशय निकृष्ट झाले आहे. या उलट ठेकेदार शहा यांनी उर्वरित जागेवर आलिशान १६ बंगले तसेच ७६ फ्लॅटपैकी ४० फ्लॅटचे काम पूर्ण केले असून त्याची विक्रीही सुरू केली आहे. वास्तविक ठेकेदाराने आधी मनपाचे दुकानगाळे बांधून ताब्यात दिल्यानंतरच त्यांना बंगलो व फ्लॅट विक्री करायचे होते. त्यातही त्यांनी अटींचा भंग केला आहे, असे शेटे यांनी सांगितले.
मनपासाठी बांधण्यात आलेल्या इमारतीच्या कामाचा दर्जा केआयटी किंवा गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज यांच्याकडून तपासून घेण्यात यावा, ७०९/अ या संपूर्ण जागेत बांधकाम करताना तळमजला, योगमंदिर व जिम्नॅशियम हॉल तेथील रहिवाशांसाठी बांधून द्यायचा होता. ते कामही ठेकेदाराने केलेले नाही. त्याची चौकशी करण्यात यावी, मनपाला निर्धारित वेळेत दुकानगाळे व कार्यालय बांधून न देणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी दाखल करावी, तसेच या बांधकामात बाहेरील टीडीआर वापरला जात असून तो त्वरित थांबवावा तसेच आरक्षित जागेचा टीडीआर घेतला आहे का याची चौकशी करावी, अशा मागण्या शेटे व कदम यांनी केल्या आहेत. यासंबंधी लेखी मागणीचे निवेदन त्यांनी नगररचना विभागाचे सहायक संचालक, आयुक्त यांच्याकडे दिले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The corporator chose the corporation to build a merchant package

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.