नगरसेविकेने सभागृहात आणले डिझेल
By admin | Published: May 13, 2017 12:16 AM2017-05-13T00:16:01+5:302017-05-13T00:16:01+5:30
नगरसेविकेने सभागृहात आणले डिझेल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : प्रभागात वाढलेला डासांचा उपद्रव पाहून धूरफवारणी करा, अशी वारंवार मागणी करूनही केवळ डिझेल नसल्याचे कारण सांगणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांचा निषेध करण्याकरिता नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी शुक्रवारी चक्क स्थायी समितीच्या सभेत डिझेलचा कॅन भरून आणला. ‘आम्ही डिझेल देतो; पण प्रभागात धूर फवारणी करा,’ अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली. यावेळी खजिल झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने धूरफवारणी करण्याची ग्वाही दिली.
कॉमर्स कॉलेज प्रभागात गेल्या काही दिवसांपासून डासांचा उपद्रव वाढला आहे. याकडे नगरसेविका आजरेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले; परंतु केवळ डिझेल नाही, असे कारण सांगून वेळ मारून नेण्याचे काम अधिकारी करीत होते. शेवटी आजरेकर यांनी मी स्वत: डिझेल खरेदी करून देते. तुम्ही तुमची यंत्रे घेऊन या आणि धूरफवारणी करा, अशी विनंती त्या करीत होत्या. तरीही अधिकारी त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या आजरेकर शुक्रवारी स्थायी समिती सभा सुरू असताना चक्क डिझेलचा कॅन व पेट्रोलची बाटली घेऊन पोहोचल्या.
महानगरपालिकेला धूरफवारणी यंत्रे चालविण्यासाठी जर डिझेल खरेदी करता येत नसेल, तर हे डिझेल घ्यावे आणि आमच्या प्रभागात फवारणी करावी, अशी विनंती आजरेकर यांनी सभेत केली. त्यांच्या या गांधीगिरीमुळे वरिष्ठ अधिकारीही खजिल झाले. त्यांनी संबंधितांना डिझेल खरेदी करून तातडीने धूरफवारणीच्या सूचना दिल्या.
‘ई’ वॉर्डसाठी टाकलेली जलवाहिनी कधी सुरू करणार? अशी विचारणा आशिष ढवळे यांनी अधिकाऱ्यांना केली. त्यावेळी शेंडा पार्कजवळ सोमवारी क्रॉस कनेक्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणी घेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली. जलवाहिनी कार्यान्वित झाल्यानंतर पुईखडीवरून थेट टेंबलाईवाडी व कावळा नाका येथील टाकीत पाणी पडणार आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी चर्चेत प्रतिज्ञा निल्ले, जयश्री चव्हाण, अफजल पीरजादे, राहुल माने, कविता माने, आदींनी भाग घेतला. झूम प्रकल्पावरील इनर्ट मटेरिअल हलविण्यासाठी आलेल्या सात निविदांपैैकी तीन निविदा टेक्निकल बिडमध्ये पात्र ठरल्या. यासंबंधीची निविदा मंजूर करताना निलोफर आजरेकर यांचा विरोध नोंदविला.