नगरसेवकासह पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना कोंडले - : नागरिकांचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:02 AM2019-07-05T01:02:35+5:302019-07-05T01:03:00+5:30
न्यू शाहूपुरी परिसरातील बेकर गल्ली येथे ड्रेनेजलाईन तुंबून त्यातील मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी होऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्यासह
कोल्हापूर : न्यू शाहूपुरी परिसरातील बेकर गल्ली येथे ड्रेनेजलाईन तुंबून त्यातील मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याच्या तक्रारी होऊनदेखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांच्यासह महानगरपालिकेचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी व सहायक पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांना गुरुवारी नागरिकांनी अक्षरश: कोंडून घालून आपला राग व्यक्त केला.
‘आधी ड्रेनेजलाईनचे काम कधी करणार ते सांगा’ अशी आक्रमक भूमिका संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे तासभर कोंडले गेलेले जलअभियंता सुरेश कुलकर्णी व सहायक पर्यावरण अभियंता आर. के. पाटील गर्भगळीत झाले. ‘ठोस आश्वासनाशिवाय तुम्हाला सोडणारच नाही’ असे ठणकावल्यानंतर कुलकर्णी यांनी फोनवर संपर्क करून एका ठेकेदारास बोलावून घेतले आणि शनिवारपासून काम सुरू करण्याची विनंती केली. ठेकेदारानेही काम करण्याची तयारी दर्शविल्यानंतर या दोघांची सुटका झाली.
न्यू शाहूपुरीतील बेकर गल्लीत गेल्या १0 वर्षांपासून ड्रेनेजलाईन तुंबत असून, त्यातील मैलामिश्रीत सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे; त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही आतापर्यंत अधिकाऱ्यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही. अखेर वैतागलेल्या नागरिकांनी जलअभियंता कुलकर्णी, सहायक अभियंता पाटील यांना एम. आर. देसाई फिजिओथेरपी सेंटरजवळ बोलावून घेतले. बेकर गल्लीपासून आयुक्त बंगला ते फिजिओथेरपी सेंटरदरम्यान ठिकठिकाणी ड्रेनेजलाईन तुंबल्याचे त्यांना दाखविले. ड्रेनेजलाईनचे काम कधी करणार? अशी विचारणा केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी अमृत योजनेत धरावे लागेल, निधी उपलब्ध झाला पाहिजे, अशी थातुरमातूर उत्तरे देण्यास सुरुवात केली; त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या दोन अधिकाºयांना फिजिओथेरपी सेंटरमध्ये नेऊन बाहेरून कड्या व कुलूप लावून त्यांना कोंडले. त्यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर देखील आत होते.
रत्नेश शिरोळकर यांनीही नागरिकांची बाजू घेत, आरोग्याचा प्रश्न असल्याने तो कधी सोडविणार सांगा? अशी विचारणा अधिकाºयांकडे केली. सुमारे तासभर दोन अधिकारी कोंडलेले होते.
हॉटेलची संख्या वाढली
कावळा नाका चौक ते दाभोळकर कॉर्नर, न्यू शाहूपुरी, बेकर गल्ली या परिसरात सर्वत्र लोकवस्ती वाढली आहे. हॉटेल्सची संख्याही वाढली आहे. या भागात पूर्वी सहा व नऊ इंची ड्रेनेजलाईन टाकण्यात आली होती; परंतु वाढत्या विस्तारामुळे त्यावर ताण पडत आहे; त्यामुळे मोठ्या क्षमतेच्या ड्रेनेजलाईन टाकण्याची आवश्यकता आहे.