नगरसेवकांना लागले दिल्लीचे वेध
By admin | Published: November 7, 2014 12:01 AM2014-11-07T00:01:41+5:302014-11-07T00:08:29+5:30
सत्ताधाऱ्यांत खळबळ : निमित्त निवडणुकीचा पैरा फेडण्याचे, प्रत्यक्षात मोट बांधण्याची तयारी
कोल्हापूर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत नगरसेवकांनी केलेल्या मदतीचा पैरा फेडण्याच्या निमित्ताने नगरसेवकांची मोट बांधण्याची तयारी महापालिकेत सुरू आहे.
नगरसेवकांना नोव्हेंबर अखेरीस ‘दिल्ली वारी’चे आवतण आल्याने सत्ताधारी नगरसेवकांत खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी अशा प्रलोभनास बळी पडू नये, यासाठी नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली असल्याची चर्चा महापालिकेत आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महापालिकेतही सत्तांतराचा डाव आखला जात असल्याची कुजबुज महापालिकेच्या चौकात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मूकसंमतीने जनसुराज्य-भाजप-शिवसेना-अपक्षांची मोट बांधत काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याची ही व्यूहरचना आहे.
कागदोपत्री सत्तांतराचे गणित अगदी जमत असले तरी प्रत्यक्षात याबाबत ‘पहले आप, पहले आप’अशीच परिस्थिती आहे. सत्तांतराच्या गाडीला हवा देण्यासाठीच ‘दिल्ली वारी’चे आयोजन केले जाणार आहे.
अनेक नगरसेवकांनी या दिल्ली वारीला संमती दिली आहे. काँग्रेसमधील किमान आठ ते दहा नगरसेवक सहलीसाठी इच्छुक आहेत. सत्तांतराच्या वाटचालीचा मार्ग प्रशस्त करणारी ही नगरसेवकांची संभाव्य दिल्ली वारी उधळण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. यासाठी उद्या, शुक्रवारी किंवा शनिवारी नगरसेवकांची बैठक घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)