देवदासी कायद्यामध्ये दुरुस्ती करा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 02:18 PM2018-11-28T14:18:39+5:302018-11-28T14:19:52+5:30
महाराष्ट प्रथा देवदासी निर्मूलन २००५ च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून पहिल्यांदा देवदासींचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून देवदासींनी मंगळवारी जिल्हाधिकारी
कोल्हापूर : महाराष्ट प्रथा देवदासी निर्मूलन २००५ च्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून पहिल्यांदा देवदासींचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी नेहरू युवा देवदासी विकास मंडळाच्या माध्यमातून देवदासींनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.
दुपारी एकच्या सुमारास महावीर उद्यान येथून माजी नगरसेवक अशोक भंडारे व माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांच्या नेतृत्वाखाली देवदासी महिलांचा मोर्चा निघाला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. महिन्याला दोन हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे, हयातीचे दाखले विनाअट मिळावेत, असे विविध फलक हातात घेतलेल्या देवदासींचा हा मोर्चा प्रमुख मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या ठिकाणी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.
आंदोलनात रेखा वडर, मालन आवळे, शारदा पाटोळे, नसीम देवडी, बायाक्का कांबळे, यल्लवा कांबळे, रेणुका गायकवाड, योगेश गवळी, आदी सहभागी झाले होते.