चुकांच्या दुरुस्तीने दहावीच्या निकालाची गती वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:21+5:302021-07-15T04:17:21+5:30
कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती ...
कोल्हापूर : विद्यार्थ्यांचे नाव, गुणांच्या नोंदी आदी स्वरूपातील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकालाबाबतच्या प्रक्रियेची गती वाढली आहे. जिल्ह्यातील सर्व ९३१ शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन पूर्ण करून त्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाला सादर केली आहे.
या विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील १,३९,५१८ विद्यार्थ्यांच्या गुणांची शाळांनी राज्य शिक्षण मंडळाने दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यात विद्यार्थ्यांचे नाव, कमी अथवा जादा गुणांची नोंद, एका विषयाचे गुण दुसऱ्या विषयासाठी नोंदविले जाणे, आदींचा समावेश आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर विभागाच्यावतीने जिल्हानिहाय शिबिर घेण्यात आले. दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या दोन दिवसांत उर्वरित प्रक्रिया संपवून निकालाबाबतची माहिती राज्य मंडळाला कोल्हापूर विभागाकडून सादर केली जाणार आहे.
पॉंइंटर
जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी : ५६,२२४
मुले : ३१,०८३
मुली : २५,१४१
मूल्यांकन पूर्ण झालेल्या शाळा : ९३१
पॉंइंटर
अशा होत्या मूल्यांकनातील चुका
१) विद्यार्थ्यांच्या नाव, आडनावामध्ये बदल
२) एका विषयाच्या गुणांची दुसऱ्या विषयाला नोंद
३) ४० ऐवजी ३० अशी गुणांची नोंद
४) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदमध्ये चुका
५) २० आणि ३० टक्के गुणांमध्ये झालेली सरमिसळ
६) गुणांची कमी-जास्त स्वरूपात नोंद
प्रतिक्रिया
मुख्याध्यापक म्हणतात...
एसएससी बोर्डाने ऑनलाईन स्वरूपात शाळांकडून गुणांची नोंद करून घेतल्याने त्यांचे काम सोपे झाले. अनेकवेळा बदललेल्या परिशिष्टांमुळे निकाल भरताना शिक्षकांची मात्र तारांबळ उडाली. गुणांची नोंद शाळांनी केल्याने निकालाचे औत्सुक्य राहिले नाही.
-जी. के. भोसले, श्री. चौंडेश्वरी हायस्कूल, हळदी
दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची ऑनलाईन नोंद करताना सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. एसएससी बोर्डाने त्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याने त्या वेळीच दूर झाल्या. राज्य मुख्याध्यापक महामंडळाने ५० हजार शिक्षकांना प्रशिक्षण दिले. बोर्डाच्या पातळीवरील कार्यवाही लवकर पूर्ण होऊन निकाल जाहीर होईल.
-बी. बी. पाटील, पी. एस. तोडकर हायस्कूल, वाकरे
प्रतिक्रिया
मूल्यांकनामध्ये शाळांच्या पातळीवरील तांत्रिक चुकांची दुरुस्ती झाली आहे. त्यापुढील प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर विभागाच्या निकालाची माहिती राज्य शिक्षण मंडळाला सादर केली जाणार आहे.
-देविदास कुलाळ, विभागीय सचिव, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ