पिनॉमिकच्या एजंटकडून कार जप्त, बँक खात्यांच्या तपशीलासाठी पत्रव्यवहार
By उद्धव गोडसे | Updated: March 13, 2024 18:14 IST2024-03-13T18:14:06+5:302024-03-13T18:14:18+5:30
सांगलीतील पिनॉमिक ट्रेडिंग कंपनीने मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली.

पिनॉमिकच्या एजंटकडून कार जप्त, बँक खात्यांच्या तपशीलासाठी पत्रव्यवहार
कोल्हापूर : दरमहा १५ टक्के परतावा आणि दहा महिन्यांत गुंतवलेल्या रकमेच्या दीडपट रक्कम देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-या पिनॉमिक ए.एस. ग्लोबल कंपनीच्या एजंटची मालमत्ता जप्त करण्याचे काम शाहूपुरी पोलिसांनी सुरू केले. एजंट मल्लाप्पा आप्पा पुजारी (वय ४८, रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) याची कार पोलिसांनी जप्त केली. तसेच अटकेतील तिन्ही एजंटच्या बँक खात्यांचे तपशील मिळविण्यासाठी बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील अन्य काही एजंटही पोलिसांच्या रडारवर आहेत.
सांगलीतील पिनॉमिक ट्रेडिंग कंपनीने मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. कंपनीच्या विविध योजनांचा प्रचार करून गुंतवणूकदारांना पैसे भरण्यास भाग पाडणारे तीन एजंट शाहूपुरी पोलिसांच्या हाती लागले आहेत. कंपनीकडून मिळालेले कमिशन आणि अन्य लाभातून त्यांनी खरेदी केलेल्या मालमत्ता जप्त करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. तपास अधिकारी उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनी एजंट मल्लाप्पा पुजारी याची कार जप्त केली. तिन्ही संशयितांच्या घरांची झडती घेतली असून, गुंतवणुकीशी संबंधित काही कागदपत्रे, कंपनीच्या गुंतवणूक योजनांची माहितीपत्रके पोलिसांच्या हाती लागली. एजंटना कंपनीकडून मिळालेल्या लाभाची माहिती घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांचे तपशील आवश्यक आहेत. यासाठी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केला असून, लवकरच याची माहिती मिळेल, असे तपास अधिकारी पाटील यांनी सांगितले.
सांगलीतील गुन्ह्यात सूत्रधार अटकेत
या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार पंकज नामदेव पाटील (रा. तासगाव, जि. सांगली) याच्यासह इतरांवर सांगलीत गेल्यावर्षी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात सांगली पोलिसांनी पाटील याला अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढत असून, अटकेतील संशयितांच्या सहका-यांनाही अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.