भ्रष्टाचारी निवृत्त होत आहेत, कारवाई कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:56 AM2019-09-28T00:56:17+5:302019-09-28T00:57:28+5:30
‘केएमटी’तील डिझेल घोटाळा, विद्युत विभागातील केंबळे घोटाळा या संदर्भात कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार करणारे कर्मचारी निवृत्त होऊ लागलेत; परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय का होत नाही? अजून किती दिवस चौकशीसाठी लावणार आहात? अशी विचारणा राजाराम गायकवाड यांनी केली.
कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत असताना ज्यांनी भ्रष्टाचार केला, असे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनास विचारण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती शारंगधर देशमुख होते.
‘केएमटी’तील डिझेल घोटाळा, विद्युत विभागातील केंबळे घोटाळा या संदर्भात कारवाई झाली नाही. भ्रष्टाचार करणारे कर्मचारी निवृत्त होऊ लागलेत; परंतु त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय का होत नाही? अजून किती दिवस चौकशीसाठी लावणार आहात? अशी विचारणा राजाराम गायकवाड यांनी केली. मात्र, या संदर्भात नेमकी माहिती नसल्यामुळे पुढील सभेला त्याची माहिती देऊ, असे सांगून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली.
नंदनवन पार्कमध्ये स्वच्छता होत नाही. महानगरपालिका सुविधा देत नाही. भागात गटार व रस्ता नागरिकांनी स्वत: केला आहे; त्यामुळे नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे ठरविले आहे. याकडे सभापती देशमुख यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. तातडीने नगररचना, आरोग्य, पवडी विभागाकडील अधिकाºयांनी कॉलनीला समक्ष भेट देऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन मतदानावर बहिष्कार टाकणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही सभापतींनी केली.
अमृत योजनेअंतर्गत ठेकेदाराने केलेले काम बरोबर नाही. तातडीने साहित्य उपलब्ध करून रस्ता बुजवून द्या. कंपनीने खुदाई केलेल्या ठिकाणी शहरात कोठेही बेस केला नाही, क्रॉस कनेक्शन पेंडिंग आहेत. एम.जी.पी.चे कामावर नियंत्रण नाही. ठेकेदाराला पाठीशी घालू नका; अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या दारात येऊन बसतील, असा इशारा सभेत देण्यात आला.
सेंट्रल किचनच्या तक्रारी बºयाच आहेत. तपासणी करून त्रुटी आढळल्यास त्यांना ब्लॅकलिस्ट करावे. बचत गटांच्या महिलांकडून काम काढून घेऊन त्यांना रस्त्यांवर आणले आहे. मग ठेकेदारांवर कारवाई का केली जात नाही, अशी विचारणा सचिन पाटील, पूजा नाईकनवरे यांनी केली. ठेकेदाराला नोटिसाकाडून खुलासा घेऊन दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अधिकाºयांनी सांगितले.
एलईडी दिवे : वारंवार बंद का
शहरातील एलईडी दिवे वारंवार बंद पडतात, याकडे लक्ष वेधण्यात आले तेव्हा आयुक्त यांनी ठेकेदारांसोबत सोमवारी (दि. ३०) बैठक आहे. त्यांना सूचना देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी सविता भालकर, भाग्यश्री शेटके, माधुरी लाड यांनी चर्चेत भाग घेतला.