तारदाळमधील भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:14+5:302021-06-22T04:17:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क तारदाळ : येथील भारत निर्माण पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
तारदाळ : येथील भारत निर्माण पाणीपुरवठ्याचे अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप होत आहेत. त्यांनी जाणीवपूर्वक या प्रकरणास राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत असतानाच भारत निर्माणचे संचालक सलीम पटेकरी यांनी त्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे.
भारत निर्माण पाणीपुरवठामध्ये नवीन केलेल्या पाईपलाईनला व्हॉल्व्ह बसविण्याची जबाबदारी ठेकेदाराची असताना १०० ते १५० व्हॉल्व्ह खरेदीची रक्कम कशी काय खर्च झाली? खराब झालेले व्हॉल्व्ह काढून नवीन बसविल्याने जुने व्हॉल्व्ह कुठे गेले, असा सवाल पटेकरी यांनी उपस्थित केला तसेच साहित्य अधिक दराने खरेदी करणे, आवक-जावकची नोंद नसणे, यावरून अध्यक्ष व सचिव गैरकारभार करत असल्याचे सिद्ध होते. सन २०१९ साली दानोळी (ता.शिरोळ) येथील जॅकवेलवरील पुरात बुडालेल्या मोटारी दुरुस्तीचा ट्रॅक्टरच्या ४ खेपांचा वाहतूक खर्च ४५ हजार रुपये दिलेला आहे ; पण सलीम पटेकरी यांनी ट्रॅक्टर मालक ओंकार कदम (रा. दानोळी) यांना प्रत्यक्षात पत्रकार परिषदमध्ये आणल्यावर त्यांना फक्त १५ हजार रुपये रोखीने भाडे दिल्याचे व सह्या घेतल्याचे सर्वांसमोर त्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक कामे बोगस करून नुसते कागदोपत्री दाखवून पैसे लाटले जात आहेत, असा आरोप पटेकरी यांनी केला. यावेळी संचालक चंद्रकांत चौगुले, किसन शिंदे, अमित खोत, शीतल मगदूम, राजू पाटील, सूर्यकांत जाधव,रणजित माने उपस्थित होते.