बसरेवाडी येथील बांधकामात झालेला भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:12+5:302021-03-19T04:22:12+5:30

गारगोटी, ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून बसरेवाडी (ता. भुदरगड) येथे १४ व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या रस्ता काँक्रीट व ...

Corruption in construction at Basrewadi | बसरेवाडी येथील बांधकामात झालेला भ्रष्टाचार

बसरेवाडी येथील बांधकामात झालेला भ्रष्टाचार

Next

गारगोटी,

ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरून बसरेवाडी (ता. भुदरगड) येथे १४ व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेल्या रस्ता काँक्रीट व आरसीसी गटार बांधकामात ठेकेदाराने खडी ऐवजी मोठे मोठे दगड घालून काम केल्याने या कामातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. या कामावर दत्तात्रय आत्माराम पाटील यांनी गटविकास अधिकारी, ग्रा.पं. प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती.

बसरेवाडी येथे १४ वा वित्त आयोगातून काँक्रीटचा रस्ता आणि गटर्सचे काम करण्यात आले आहे. या कामाचा ठेका शेळेवाडी येथील ठेकेदार सूरज पाटील यांनी घेतलेला आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने सुरुवातीपासून काही गावकरी तक्रार करत होते; पण ठेकेदाराने ग्रा.पं. प्रशासन आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून तक्रारदारांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. दत्तात्रय पाटील यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी एस. जे. पवार यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी या तक्रारीची दखल घेऊन बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता वायचळ यांना तपासणीचे आदेश दिले. त्यांनी गुरुवारी या गटार बांधकामाचा दर्जा तपासण्यासाठी तक्रारदार, सरपंच, ग्रापं सदस्य, ग्रामसेवक, ठेकेदार यांच्या समक्ष त्याचा कठडा फोडला असता त्यामध्ये दगड, गोट्याचा वापर केला असल्याचे आढळून आले.

याबाबत पंसच्या अभियंता वायचळ यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, ‘हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, ठेकेदारावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांच्याकडे अहवाल सादर करणार आहे.’

ठेकेदार सूरज पाटील म्हणाले, ‘या कामात कोणताही भ्रष्टाचार केला नसून तीन इंच पडदीच्या बिलाची मागणी करणार आहे.’

तक्रारदार पाटील म्हणाले, ‘सर्वांच्या समक्ष कठडा फोडला असता सर्व बांधकामात दगड घातल्याचे दिसत आहे. दोषी ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी.’

ग्रामसेविका माधुरी पाटील म्हणाल्या, ‘या कामाचा अहवाल प्राप्त झाल्यावर पदाधिकाऱ्यांच्या सल्ल्याने दोषी ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.’

फोटो १८ बसरेवाडी वर्क

ओळ

गटर्सचा कठडा फोडला असता, त्यात आढळून आलेला दगड.

Web Title: Corruption in construction at Basrewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.