कृषिपंपाच्या वीज जोडणीत भ्रष्टाचार
By admin | Published: March 30, 2016 12:37 AM2016-03-30T00:37:54+5:302016-03-30T00:40:12+5:30
राजू शेट्टी : जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ‘महावितरण’चे अधिकारी धारेवर
कोल्हापूर : ‘महावितरण’च्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. तसेच कृषीपंपाच्या वीज जोडणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला. अधिकारी, वायरमन व ठेकेदार यांनी संगनमताने शेतकऱ्यांची सुरू केलेली लूट थांबवावी, अन्यथा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हा सनियंत्रण समितीची सभा मंगळवारी राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यामध्ये विविध विभागांचा आढावा घेत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ‘सांसद आदर्श ग्राम योजने’मध्ये समाविष्ट गावातील कामे कृती आराखड्याप्रमाणे प्राधान्याने पूर्ण करावीत. ही गावे निर्मल करण्याच्या दृष्टीनेही लक्ष द्यावे. चार तालुके, महापालिका व आठ नगरपालिका या निर्मल झाल्या असून, उर्वरित तालुक्यांसाठी लोकसहभागातून चळवळ गतिमान करण्याची सूचना खासदार शेट्टी यांनी केली. केंद्राच्या योजना सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या असून लोकप्रतिनिधींनी सक्रिय होऊन लोकांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन खासदार शेट्टी यांनी केले. संभाव्य पाणीटंचाई पाहता शासकीय यंत्रणेने सतर्क राहावे. ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कोरड्या पडलेल्या तलावांतील गाळ काढून जलस्रोत बळकट करावेत, असेही त्यांनी सांगितले. शासनाच्या उपक्रमांची अंमलबजावणी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांबाबत प्राधान्यक्रम ठरवून रस्त ेदुरुस्तीचा कार्यक्रम घ्यावा, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनातील कामे दर्जेदार करावीत, अशी सूचनाही खासदार राजू शेट्टी यांनी केली.
यावेळी आरोग्य विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा खासदार धनंजय महाडिक यांनी घेतला. ते म्हणाले, आरोग्य केंद्रात आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य यंत्रणेकडून हयगय अथवा टाळाटाळ चालणार नाही. केंद्रात सामान्य माणूस येतो, त्याला चांगल्या सुविधा द्या. गगनबावडा येथील ‘कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय’ या विद्यालयास राज्यातील आदर्श विद्यालय बनविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा आराखडा सादर करावा, त्याला निधी दिला जाईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी खासदार शेट्टी व खासदार महाडिक यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला.
जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मुद्रा योजनेत जिल्ह्याने उद्दिष्ट पूर्ण करीत २२ हजार प्रकरणे मंजूर करून त्यांना १८८ कोटी ७४ लाखांचा निधी दिला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत साडेसहा लाख खातेदार, तर प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत तीन लाख ३१ हजार लोक सहभागी झाले आहेत. अटल पेन्शन योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय सदस्य, विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांनी ‘स्वाभिमानी’कडे तक्रार करावी
वीजजोडणीसाठी महावितरण कंपनीच्या अधिकारी अथवा ठेकेदारांनी पैसे घेतले असतील, त्या शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर कार्यालयात तक्रार द्यावी. संबंधित शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून देऊ, असे शेट्टी यांनी सांगितले.
शाळांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी
जिल्हा नियोजन मंडळातून शाळांच्या दुरुस्तीसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर ‘मनरेगा’ कार्यक्रमांतर्गत जलसंधारणाची २१६ कामे सुरू असून, त्यावर ४६२१ मजूर काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी सैनी यांनी सांगितले.