जलयुक्त शिवार अभियानात भ्रष्टाचार
By Admin | Published: April 7, 2017 01:05 AM2017-04-07T01:05:38+5:302017-04-07T01:05:38+5:30
शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याची मागणी
कोल्हापूर : जिल्ह्यातील जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय समिती नेमून संपूर्ण योजनेची चौकशी करावी, तसेच भ्रष्टाचारात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे या मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना दिले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी केले.
दरम्यान, या जलयुक्तशिवार अभियानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी इन्कार केला; पण या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिले.
जलयुक्त शिवार या अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या ६९ गावांत सुमारे ३० कोटींचा निधी खर्च पडून १२०९ कामे केली, पण बहुतांश कामे निरुपयोगी, निकृष्ट, पाणी न अडविणारी झाल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने केला. शेततळी केली असली तरीही पाणी साठत नाही. काही तळी आणि माती नाला बांध आत्ताच मातीने भरले आहेत. कामे घाईत उरकून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी
डॉ. अमित सैनी यांच्याकडे केला.
या कामाच्या आधारे कोल्हापूर जिल्हा कृषी विभागाने पाणीसाठा निर्मिती झाली आहे, असे दाखविले; पण प्रत्यक्षात खोटा अहवाल दिला आहे. हे अभियान राबविताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, दरवर्षी पाणीटंचाईचा होणारा आराखडा, भूजल पातळी याचा विचार केला नाही. जलसंपदा विभाग, कृषी विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्यात समन्वय नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचाही आरोप करण्यात आला.
या शिष्टमंडळात शहरप्रमुख दुर्गेश लिग्रस, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगले, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, राजू सांगावकर, सुनील पोवार, संभाजीराव भोकरे, संजय जाधव, दिलीप देसाई, प्रसाद आडनाईक, प्रवीण सावंत, आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)