घरफाळा विभागातील भ्रष्टाचाराची चौकशी थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:16 AM2021-07-08T04:16:33+5:302021-07-08T04:16:33+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात झालेले घोटाळे शोधताना ‘एक साथ सारेच’ सामील असल्याची बाब चौकशीत समोर येत असून या ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात झालेले घोटाळे शोधताना ‘एक साथ सारेच’ सामील असल्याची बाब चौकशीत समोर येत असून या ‘साऱ्यांनी मिळून’ चौकशी समितीला पूर्णपणे असहकार्य करायचे ठरविले आहे. त्यामुळे कथित भ्रष्टाचाराची चौकशी थंडावली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहकार्य नाकारण्याची ही महापालिका इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागात गेल्या वीस पंचवीस वर्षात झालेल्या घोटाळ्यांची चर्चा चव्हाट्यावर आली आहे. गेल्या दीड वर्षापासून कागदोपत्री पुराव्यासह काही प्रकरणे राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्कालीन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना सादर केली आणि घोटाळ्यांना तोंड फुटले. कलशेट्टी यांनी सहा महिने तपास केल्यानंतर एक करनिर्धारक, दोन अधीक्षक, एक क्लार्क अशा चौघांना निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही नोंदविले.
घोटाळ्यांचे हे प्रकरण चौदा पंधरा प्रकरणांवर थांबले असे दिसत असताना अचानक महापालिका सदस्यात शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आणि घोटाळ्याची प्रकरणांची रांगच लागली. घरफाळा विभागात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांनी आपणच मालक असल्याच्या अविर्भावात अडीचशे प्रकरणात घरफाळ्यात सवलती दिल्याची व महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केल्याची बाब समोर आली. चौकशी करणारी तीन सदस्यांची समितीही चक्रावून गेली.
दरम्यानच्या काळात कलशेट्टी यांची बदली झाली आणि आयुक्त म्हणून कादंबरी बलकवडे यांनी कार्यभार घेतला. त्यांनी घरफाळा चौकशीचे काम अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त विनायक औंधकर व अंतर्गत लेखा परीक्षक संजय सरनाईक यांच्याकडे सोपविले. औधकर हे अनुभवी अधिकारी असल्याने त्यांना चौकशी करताना जाणवले की ,यामध्ये अनेक कर्मचारी, अधिकारी सहभागी आहेत. त्यामुळे चौकशीच्या वेळी जे जे समोर येतील त्या त्या कर्मचाऱ्यांना, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना नोटिसा काढण्यास सुरवात केली. त्याच्याकडून खुलासे मागविले. सुमारे २०० ते २५० नोटिसा त्यांना काढल्या. पण कोणत्याही कर्मचाऱ्याने त्याला उत्तर दिले नाही.
- असहकारामुळे अधिकारी हतबल -
घरफाळ्यातील घोटाळ्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीला काही माहिती द्यायची नाही, नोटीस मिळाली तर त्याला उत्तर द्यायचे नाही असा जणू निर्धारच केला आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन दोन नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही गोची झाली आहे. घरफाळ्याचे एकतर किचकट काम आणि त्यात कर्मचाऱ्यांचे असहकार्य यामुळे अधिकारीही हतबल झाले आहेत.
वॉर्डनिहाय तक्रारी दाखल -
माजी उपमहपौर भूपाल शेटे यांनी चारही विभागीय कार्यालयाच्या कक्षेत येणाऱ्या मिळकत निहाय दोनशे तक्रारी दिल्या आहेत. त्यासंबंधीचे पुरावेही दिले आहेत. म्हणजे चौकशी समितीने फक्त खातरजमा करायची आहे. परंतु चौकशी कामी संबंधित कर्मचारी व अधिकारी याचे म्हणणेही ऐकून घेणे समितीला आवश्यक आहे. नेमके घोडे तेथेच अडकले आहे.
जलसमाधी आंदोलन होणार -
या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे उद्या, शुक्रवारी पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसे पत्र समितीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिले आहे. मात्र सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी समितीच्या सदस्यांना चर्चेला बोलविले आहे. पण बलकवडे या असतील तरच चर्चेला येऊ, असे समितीने म्हटले आहे.
दहा महिने झाले अहवाल कपाटात-
चौकशी समितीने जेवढी काही चौकशी करणे शक्य होते त्यावर आधारित अंतिम अहवाल आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे दिल्यानंतर १६ ऑगस्ट २०२० रोजी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. पण त्यावर काहीच झालेले नाही.