भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 01:05 AM2017-12-25T01:05:58+5:302017-12-25T01:06:39+5:30

Corruption will not be tolerated | भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

भ्रष्टाचार खपवून घेणार नाही

Next


कोल्हापूर : तलाठ्यांनी अंतर्मुख होऊन जनतेची कामे करताना आपले स्वत:चेच काम आहे, असे समजून करावे. वर्षभरात राज्यात तीनशेहून अधिक तलाठी लाचखोरीमुळे निलंबित झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पारदर्शकतेबाबत आग्रही आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे दिला. तसेच सातबारा आॅनलाईनचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून महाराष्टÑ देशात पहिल्या क्रमांकावर नेऊया, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लोणार वसाहत येथील गणेश हॉल येथे महाराष्टÑ राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा व आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती पुणे जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल, सरचिटणीस लक्ष्मीकांत काजे, विभागीय अध्यक्ष बी. बी. काळे, जिल्हाध्यक्ष धनाजी कलिकते, महाराष्टÑ तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष शाम जोशी, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, तहसीलदार चंद्रशेखर सानप आदींची होती.
मेळावा व आमसभेचे उद्घाटन महसूलमंत्री पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने झाले.
महसूलमंत्री पाटील म्हणाले, आॅनलाईन सात-बाºयाचे काम ६० टक्क्यांपर्यंत झाले असून हे काम फेबु्रवारीपर्यंत पूर्ण करून विजयाची गुढी उभा करूया. भ्रष्टाचार करू नका कारण इथून पुढचा काळ हा प्रामाणिकपणाचा असून सर्वसामान्य माणूस हा प्रामाणिकपणालाच संधी देणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात २० तर राज्यात ३०० हून अधिक तलाठी लाचखोरीत निलंबित झाले. त्यासाठी अंतर्मुख होण्याची गरज आहे. त्यामुळे भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. सरकार तलाठ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी व मागण्या मान्य करण्यास बांधील आहे. पुढील महिन्यात महसूलसंदर्भात मुंबईत बैठक घेऊन तलाठी संघाच्या पदाधिकाºयांशी चर्चा करू.
एस. चोक्कलिंगम म्हणाले, राज्यातील ७५ तालुक्यांचे व पुणे विभागातील ३०० गावांचे संगणकीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील कामासाठी संगणकाची गती वाढविण्यासाठी भारत संचार निगमकडून प्रयत्न होत आहेत. उर्वरित काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत पूर्ण होईल.
ज्ञानदेव डुबल म्हणाले, सातबारा संगणकीकरणाचा प्रकल्प हा शासनासह तलाठ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने पुरेशा सुविधा नसतानाही तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी सर्व्हरच्या स्पीडसह इतर मागण्या सोडवाव्यात.
म्हातारदेव सावंत यांनी स्वागत केले. लक्ष्मीकांत काजे यांनी प्रास्ताविक केले.
तलाठी सरकारचे कान अन् डोळे
तलाठी हे सरकार व गावचे कान आणि डोळे आहेत. त्यांच्याकडून सरकारला योग्य ती माहिती मिळते. त्यामुळे सरकार नेहमीच त्यांच्याकडे आदराने पाहत आला आहे. संपूर्ण गावाचे माहिती केंद्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकार बांधील आहे, असे महसूलमंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Corruption will not be tolerated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.