गोठे येथील पेयजल योजनेच्या कामात भ्रष्टाचार
By admin | Published: April 22, 2015 09:44 PM2015-04-22T21:44:57+5:302015-04-23T00:58:50+5:30
माजी सरपंचांचा आरोप : बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक
कळे : गाठे (ता. पन्हाळा) येथील पेयजल योजनेच्या कामात बोगस कागदपत्रांचा वापर करून ग्रामस्थांसह शासनाची फसवणूक करून मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी सरपंच सुनील पोतदार यांनी पत्रकार परिषदेत केला. यासंदर्भात शासनाच्या विविध कार्यालयात अर्ज देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही. याची गांभीर्याने चौकशी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोतदार यांनी दिला आहे.जॅकवेल बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वमालकीची जागा लागते. त्यासाठी धोंडिराम यशवंत पाटील यानी गट नं. १७६ ची जमीन ग्रामपंचायतीला बक्षीसपत्र करून दिली आहे. परंतु, प्रत्यक्षात गट नं १७ची जमीन बांधकामास प्रमाणित असल्याचे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे; पण प्रत्यक्षात जॅकवेल
बांधकाम वेगळ्याच गटनंबरमध्ये चालू आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेची फसवणूक केली असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत केला आहे.जॅकवेल बांधकाम चुकीच्या ठिकाणी सुरू असून, ते सर्व काम बंद ठेवण्याबाबत माजी सरपंच सुनील पोतदार यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीचे आदेश येऊनही वरिष्ठांच्या आदेशाची दखल न घेताच ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ठेकेदाराने काम सुरू केले असल्याचाही आरोप केला आहे.
तसेच दि. १२/०८/२०१३ च्या ग्रामसभेत ठराव क्र. २० नुसार सामाजिक लेखा परीक्षण व नियंत्रण समिती गठित करण्यात आली होती. त्यामध्ये एका ग्रामपंचायत महिला सदस्याची बोगस सही केली असल्याची माहिती पोतदार यांनी देऊन पेयजल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सांगितले. शासनाने चौकशी करून काम योग्य पद्धतीने
करावे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.
पत्रकार बैठकीस शिवाजी पाटील, बी. एन. पाटील, जोतिराम पाटील, श्रीकांत पाटील, आनंदा शिंदे, सुरेश कांबळे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रात कोणत्याही प्रकारची बोगसगिरी नाही. आवश्यक ते बदल ग्रामपंचायत पेयजल योजना कमिटी व ग्रामीण पाणी पुरवठाविभागामार्फत सोयीनेच केले आहेत. शिवाय शासनाच्या आदेशानुसारच काम सुरू केले आहे. अद्याप कमिटीकडे कोणत्याही प्रकारचा निधी जमा झाला नसल्याने भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधकांनी कितीही आकांडतांडव केले, तरी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावासाठी नितांत आवश्यक असणारी पेयजल योजना पूर्ण करणारच. - संगीता पाटील, सरपंच, गोठे ग्रामपंचायत.