पंचगंगेत मृत माशांचा खच
By admin | Published: November 11, 2015 09:42 PM2015-11-11T21:42:49+5:302015-11-11T23:38:35+5:30
शिरोळमधील प्रकार : नदी प्रदूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी
कुरुंदवाड : पंचगंगा नदीपात्रात रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याने नदीला काळेकुट्ट पाणी आले आहे. तसेच पाण्याला उग्र वास येत असून, तेरवाड बंधाऱ्यात मृत माशांचा थर पडला आहे. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान, पंचगंगा नदीकाठी मृत माशांचा थर पडल्याचे समजताच नदी प्रदूषण विरोधी मुंबई उच्च न्यायालयात न्यायालयीन लढा देणारे अॅड. धैर्यशील सुतार यांनी तेरवाड बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दुर्लक्षामुळेच येथील नागरिकांना दूषित पाण्याला सामोरे जावे लागत असून, इचलकरंजी नगरपालिका व इचलकरंजी सीईटीपीची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या आठ दिवसांपासून पंचगंगा नदीतील पाणी आटल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत असतानाच धरणातून पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा व ऐन दिवाळीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुटीचा फायदा घेत इचलकरंजी शहरातील सांडपाणी व औद्योगिक कारखान्याचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडल्याने पंचगंगा नदीपात्रातील पाणी पूर्णपणे दूषित बनले आहे.
धरणातील पाण्यापेक्षा सांडपाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने पाणी काळेकुट्ट बनले आहे. तेरवाड बंधाऱ्यातून पाणी विसर्ग होताना फेसाळत असून, त्याचा उग्र वास येत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण घटल्याने नदीपात्रातील मासे तडफडून मरून पडत आहेत. लहान-मोठ्या मृत माशांचा मोठा थर तेरवाड बंधाऱ्यावर येऊन साचला आहे. बुधवारी सकाळी मासेमारी करणाऱ्या बागडी समाजातील नागरिकांनी मृत मासे गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. तसेच बंधाऱ्यातून पाण्याच्या विसर्गाबरोबर मासेही वाहून जात होते. दूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
औद्योगिक सांडपाणी जबाबदार
पंचगंगेत कोल्हापूरपासून इचलकरंजीपर्यंतच्या औद्योगिकीकरणाचे पाणी सोडल्याने उन्हाळ्यात नदीतील मासे मरून पडत असत. यावेळी मात्र तेरवाड बंधाऱ्यातच मासे मरून पडल्याने इचलकरंजी शहरातीलच औद्योगिकीकरणाच्या सांडपाण्यामुळे मासे मेले आहेत, हे सिद्ध होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाला इचलकरंजीतील औद्योगिक कारखानेच जबाबदार आहेत.