कार मालकांना न सोसणारा खर्चाचा झटका --महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:38 AM2019-08-23T00:38:34+5:302019-08-23T00:39:27+5:30
अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.
कोल्हापूर : महापुरात दुचाकींसह चारचाकींमध्ये पाणी शिरून लाखोंचा फटका बसला. प्रत्येकाला आपले वाहन लवकर दुरुस्त करून मिळावे, याकरिता गाड्यांच्या रांगांसह चालकमालकांनी गॅरेजसमोर एकच गर्दी केली आहे. दुचाकींच्या तुलनेत कारच्या दुरुस्तीचा झटका न सोसणारा आहे.
शहरासह करवीर, आंबेवाडी, चिखली, शिरोळ, बाजारभोगाव, पन्हाळा तालुका, आदी भागांत पुराचे पाणी शिरले. संसारोपयोगी वस्तूंसह दारातील वाहनेही त्यात बुडून गेली. पुराचे पाणी गाडीच्या चाकांपर्यंत होते, तोपर्यंत अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही. तेच पाणी चाक ओलांडून डॅशबोर्डपर्यंत गेले आणि त्यानंतर टपासह गाडी पूर्णपणे बुडाली. यात अनेकांनी गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इंजिनसह इलेक्ट्रॉनिक सर्किटही जळून गेले. त्यामुळे हजारांचा खर्च लाखांत कधी गेला, हे पूरग्रस्त गाडीमालकांना कळलेच नाही.
त्यामुळेअशा चारचाकी शहरातील विविध कंपन्यांच्या वितरकांसोबत खासगी गॅरेजांच्या दारात उभ्या आहेत.यात विमा असलेल्या वाहनधारकांना कमी प्रमाणात खर्च अपेक्षित आहे;तर ज्यांच्या विमाच नाही,अशा वाहनांना येणारा दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे अनेकांनी दारातील गाडीच हलविलेली नाही.
सद्य:स्थितीत चारचाकींमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे (मॅकेट्रॉनिक्स) इंजिन, वायरिंग, आदी असल्यामुळे ते सुटे भाग बदलण्याशिवाय वाहनधारकांकडे पर्यायच उरलेला नाही. प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार खर्चाचे आकडेही वाढत आहेत. कारण एकेका सुट्या भागाची किंमत किमान ७० ते ८० हजारांच्या घरात आहे. सुट्या भागाचे दर हे कारचालकांना अशा पद्धतीने दुरूस्ती निघाल्याने परवडणारे नाही. त्यामुळे असे वाहनधारक हवालदिल झाले आहेत.
बाधित झालेले सुटे भाग असे
वाहनाचे कंट्रोल युनिट, आयसी सर्किट युनिट, गिअर बॉक्समधील सेन्सर युनिट सर्किट, व्हील बेअरिंग्ज, स्टेअरिंग बेअरिंग, इंजिनमधील लो प्रेशर पंप, हाय प्रेशर पंप, अल्टरनेटर, स्टार्टरसह बेअरिंग्ज, रिमोट युनिट, साउंड सिस्टीम, सेंट्रल लॉक सिस्टीम, कुशन, सीट कव्हर, पेट्रोल इंजिनमध्ये पाणी गेल्यानंतर ते खोलून पुन्हा जोडावे लागते.
डिझेल इंजेक्शन पंप, बॅटरी, स्टार्टर, मॅकेट्रॉनिक्सचे सर्किट बोर्ड असे एक ना अनेक सुटे भाग पुराच्या पाण्यात बाधित झाले आहेत.
सुटे भाग अतिशय महाग
वाहनाच्या प्रकारानुसार सुट्या भागाच्या किमती असल्याने एकेका भागाची किंमत ७० ते ८० हजार रुपये आहे. अनेक वाहनांमध्ये या भागांची दुरुस्ती होत नाही. त्यामुळे तो भाग बदलण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. प्रत्येक गॅरेजसमोर अशी कित्येक वाहने उभी आहेत.त्यांची दुरुस्ती करायची की नाही अशा संभ्रमावस्थेत वाहनधारक आहेत. त्यामुळे पूरबाधित क्षेत्रात जनजीवन पूर्वपदावर येऊनही अशी वाहने घराच्या दारात अजूनही उभी आहेत.
कमीत कमी खर्चात अशी पूरबाधित वाहने दुरुस्त करून देण्याचा प्रयत्न शहरातील मेकॅनिक बंधू करीत आहेत. अशा वाहनांकरिता गॅरेजचालक रात्री उशिरापर्यंत काम करीत आहेत. काही भाग दुरुस्त होत नाहीत. त्यामुळे ते बदलण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे खर्च वाढत आहे.
- सुधीर महाजन, समन्वयक,
कोल्हापूर जिल्हा फोर व्हीलर मेकॅनिकल असोसिएशन