Kolhapur- कफ सिरपचे जार वाटले, मात्र कागदावर नोंदवल्या बाटल्या; जिल्हा परिषदेचे युवराज बिल्ले यांची तडकाफडकी बदली
By समीर देशपांडे | Published: February 14, 2024 01:19 PM2024-02-14T13:19:09+5:302024-02-14T13:19:28+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : देणगीतून मिळालेले कफ सिरपचे जार वरिष्ठांना न सांगता ५०हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात ...
समीर देशपांडे
कोल्हापूर : देणगीतून मिळालेले कफ सिरपचे जार वरिष्ठांना न सांगता ५०हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरित करण्यात आले. मात्र, कागदोपत्री नोंदवताना सिरपच्या बाटल्या, अशी संशयास्पद नोंद करणारे जिल्हा परिषदेचे औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. चौकशीत ते सकृतदर्शनी दोषी ठरल्याने त्यांची तडकाफडकी चंदगड तालुक्यातील अडकूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
या औषध भांडारमध्ये बिल्ले हे गेली १६ वर्षे कार्यरत होते. कोरोनाकाळातील खरेदीमध्ये ते चर्चेत आले. त्यावेळी त्यांनी चांगले काम केल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदनही केले. परंतु, कोरोनाकाळातील खरेदीप्रकरणी त्यांची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून झाल्यानंतर त्यांच्या कारभाराची चर्चा सुरू झाली. अशातच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र गायकवाड यांच्याकडे काही प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून दूरध्वनी आले. आम्हाला सिरपचे जार देण्यात आले असून, नोंद मात्र सिरपच्या बाटल्या म्हणून करा, अशा वरिष्ठांकडून सूचना असल्याचे सांगितले जाते.
हा प्रकार काय आहे, यावर डॉ. गायकवाड यांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर आणि जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी रेंदाळकर यांची चौकशी समिती नेमण्यात आली. या दोघांनी पुलाची शिरोली, ता. हातकणंगले, अंबप, ता. हातकणंगले आणि उचगाव, ता. करवीर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. या ठिकाणी मुळात सिरपचे जार देण्यात आले. परंतु, कागदोपत्री नोंदवलेल्या आणि प्रत्यक्षातील बाटल्यांमध्ये पुलाची शिरोली येथे ८०, अंबप येथे तब्बल २२०० तर उचगाव येथे ५०० बाटल्यांचा फरक सापडला आहे. त्यामुळेच बिल्ले यांची चंदगड तालुक्यातील अडकूर येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
..तरीही कोल्हापुरातच
बिल्ले यांची जरी चंदगड तालुक्यात बदली झाली असली तरी ते तिथे हजर होऊन रजा टाकून कोल्हापूरमध्ये असल्याचे सांगण्यात आले. कोरोनाकाळातील काही रेकॉर्ड तयार करण्यासाठी राजीनामा दिलेल्या ‘डॅम’सोबत सीपीआरमध्ये कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू असल्याची जोरदार चर्चा जिल्हा परिषदेत सुरू झाली आहे.