नगरसेवकाची मर्कटलीला, भरसभेत घेतले चुंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 09:52 AM2020-01-31T09:52:24+5:302020-01-31T09:54:56+5:30

कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी दुपारी बोलविण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू होताच, कमलाकर भोपळे विरोधी बाकावरून उठले आणि सत्ताधारी आघाडीच्या बाकावरील स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्या आसनाजवळ बसले.

Councilor Merkatli kissed in a rally | नगरसेवकाची मर्कटलीला, भरसभेत घेतले चुंबन

नगरसेवकाची मर्कटलीला, भरसभेत घेतले चुंबन

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांतून संताप : महापौरांनी व्यक्त केली नाराजी त्यांनी मला ७५ लाखांचा विकासनिधी मंजूर केला आहे. त्याबद्दल मी सभागृहात गळाभेट घेत देशमुख यांचे चुंबन घेतले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

कोल्हापूर : प्रभागातील विकासकामांकरिता ७५ लाखांचा निधी दिल्याबद्दल नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांचे चक्क चुंबन घेऊन आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे हा अश्लाघ्य प्रकार गुरुवारी झालेल्या महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसेवकांसमक्ष घडला. आनंद व्यक्त करण्याच्या या मर्कटलीलेबद्दल सर्व नगरसेवक, अधिकारी यांनी संताप व्यक्त केला. ‘चोर तो चोर आणि वर शिरजोर’ या म्हणीचा प्रत्यय आणून देत भोपळे यांनी आपल्या मर्कटलीलेचे समर्थनही केले.

कोल्हापूर महानगरपालिकेची विशेष सभा गुरुवारी दुपारी बोलविण्यात आली होती. सभेचे कामकाज सुरू होताच, कमलाकर भोपळे विरोधी बाकावरून उठले आणि सत्ताधारी आघाडीच्या बाकावरील स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांच्या आसनाजवळ बसले. आसन सोडून दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे सभागृहाच्या नजरा भोपळे यांच्यावर खिळून राहिल्या. नेमक्या त्याच वेळी कोल्हापूर पोलिसांनी राजस्थानातील गॅँगस्टर्सना पकडल्याबद्दल त्यांच्या बहाद्दूरपणाचे अभिनंदन करणा-या ठरावाचे वाचन सुरू होते.

भोपळे अचानक आपल्या जागी उभे राहिले आणि त्यांनी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांना कडकडून मिठी मारली. पाठोपाठ त्यांनी देशमुख यांचे चुंबनही घेतले. मिठी मारल्यामुळे देशमुख यांनाही जागेवरून बाजूला होता आले नाही. भोपळे हे सुमारे मिनिटभर त्यांचे चुंबन घेत होते. यावेळी सभागृहात जोरात हास्यकल्लोळ उडाला. सभागृहातील सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. हा प्रकार सुरू असताना पोलिसांच्या अभिनंदनाच्या ठरावाचे वाचनही संपले, याचे कोणालाच भान राहिले नाही. या प्रकाराने महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर या संतप्त झाल्या. त्यांनी सर्व नगरसेवकांना सुनावत ‘अभिनंदन ठरावाचे वाचन झाले. आता टाळ्या तरी वाजवा...!’ अशा शब्दांत तीव्र नाराजी व्यक्त केली.

भरसभेत एखाद्या नगरसेवकाने दुसºयाचे चुंबन घेणे हे नियमबाह्य तसेच निषेधार्ह आहे. एक प्रकारचा विनयभंग आहे. विशेष म्हणजे महिला सदस्य सभागृहात उपस्थित असताना असे चुंबन घेणे चीड आणणारेच आहे. सभागृहात सर्वच नगरसेवकांनी हा प्रकार हसण्यावारी नेला; परंतु त्याचे गांभीर्य लक्षात येताच अनेकांनी तीव्र शब्दांत त्याचा संताप व्यक्त केला. मात्र, भोपळे यांनी सभा संपल्यानंतरही या मर्कटलीलेचे समर्थन केले. विरोधी गटात असूनही माझ्यावर कॉँग्रेसच्या नगरसेवकांचे आणि स्थायी सभापतींचे विशेष प्रेम आहे. त्यांनी मला ७५ लाखांचा विकासनिधी मंजूर केला आहे. त्याबद्दल मी सभागृहात गळाभेट घेत देशमुख यांचे चुंबन घेतले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. भोपळे हे ताराराणी आघाडीचे नगरसेवक असून, ते टेंबलाईवाडी प्रभागातून निवडून आले आहेत.

सभागृहाचे पावित्र्य राखणे महत्त्वाचे
महापालिका सभागृह हे एक सर्वोच्च आणि पवित्र सभागृह आहे. अशा सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर सांगोपांग चर्चा होऊन निर्णय घेतले पाहिजेत. सभागृहाचे पावित्र्य राखणे ही सर्वच नगरसेवकांची जबाबदारी आहे. मात्र आपला आनंद व्यक्त करण्याकरिता सभागृहात असे किळसवाणे प्रकार करणे अत्यंत खेदजनक आहे, अशा संतप्त प्रक्रिया सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर नगरसेवकांनी व्यक्त केल्या.
 

 

Web Title: Councilor Merkatli kissed in a rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.