नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

By Admin | Published: June 18, 2015 12:04 AM2015-06-18T00:04:05+5:302015-06-18T00:39:36+5:30

इचलकरंजी नगरपालिका : कारभाऱ्यांनी प्रशिक्षण वर्ग घ्यावेत; नागरिकांची अपेक्षा

Councilors need awakening | नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

नगरसेवकांचे प्रबोधन गरजेचे

googlenewsNext

राजाराम पाटील - इचलकरंजी --नगरपालिकेत असलेल्या समन्वयाच्या अभावामुळेच नगरसेवकांत होणारे राडाचे प्रसंग घडत आहेत. वास्तविक पाहता नगरपालिकेचे कामकाज चालविणाऱ्या नेतृत्वाने यावर नियंत्रण ठेऊन संबंधितांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. नगरपालिका म्हणजे विकास-विधायक कामाचे केंद्र आणि नागरी सेवा-सुविधा पुरविण्याचे ठिकाण असल्याचे सांगण्याची आवश्यकता आहे.
साधारणत: शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इचलकरंजी नगरपालिकेला जसा इतिहास आहे, तसे ऐतिहासिक महत्त्वही आहे. स्वातंत्र्योत्तर काळात पहिले नगराध्यक्ष कै. बाळासाहेब चिवटे यांच्यानंतर अनेक दिग्गजांनी नगरपालिकेचे नेतृत्व केले. त्यामध्ये कै. पी. टी. कणसे, कै. रामभाऊ जगताप, कै. सदाशिवराव मुरदंडे, कै. सदाशिवराव सुलतानपुरे, कै. श्रीपतराव वडिंगे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींचा समावेश आहे. तर अशोकराव आरगे, अशोकराव जांभळे, शंकरराव पुजारी, रामकुमार मर्दा, हिंदुराव शेळके, राजीव आवळे, संजय आवळे, आमदार सुरेश हाळवणकर, किशोरी आवाडे, मेघा चाळके, आदी मान्यवरांनी नगराध्यक्षपद आणि नेतृत्वाची धुरा वाहिली आहे.
नगरपालिकेमध्ये पूर्वीपासूनच राजकीय पक्षांच्या झेंड्याखाली निवडणुका लढविण्याची परंपरा आहे. निवडणुकीनंतर सर्वच पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेऊन शहराच्या विकासासाठी एकत्रित येतात. एकजुटीने, एकसंघपणे दिशा ठरवून प्रगती साधली जाते. त्याकाळी वाद-विवाद होत असत; पण ते पालिका सभागृहात आपापल्या परीने नोंदविले जात. सभागृहात शाब्दिक चकमक, कागदांची फेकाफेक, माईकची आदळआपट होई; पण सभागृहाबाहेर एकदिलाने कामकाज चालविले जाई.
अशा परंपरेला अलीकडील काळात मात्र गालबोट लागत आहे. काही नगरसेवकांच्या आग्रहाच्या अतिरेकामुळे वादाचे प्रसंग घडू लागले आहेत. नगरसेवक विरूद्ध नगरसेवक आणि नगरसेवक विरूद्ध प्रशासन असे संघर्ष होत असताना टोकाची भूमिका घेतली जात आहे. शिवीगाळ, हाणामारी, रेटारेटी अशा घटनांमुळे नगरपालिकेच्या पावित्र्याला तडा जाऊ लागला आहे. त्यामुळे पालिकेचे नेतृत्व करणाऱ्या कारभाऱ्यांनी आता आत्मकेंद्रित होऊन विचार करावा. नगरसेवकांचे प्रबोधन करावे. जेणेकरून नगरपालिकेची विस्कटलेली घडी पुन्हा बसून विकास-प्रगती साधत, शहराचे हित जोपासत कामकाज चालवावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

गोपनीय अहवालाची चर्चा
नगरपालिकेत काही नगरसेवक मक्तेदार असल्याचा मोठा बोलबाला आहे. त्यामुळे पालिकेची घडी विस्कटली. कामांचा दर्जा ढासळला. ‘टक्का’ संस्कृती बोकाळली. परिणामी नगरपालिकेत कमालीचा गोंधळ वाढीस लागला. याची दखल घेत एक महिन्यापूर्वी खुद्द आमदार सुरेश हाळवणकर यांनी नगरपालिकेत येऊन झाडाझडती घेतली. त्यावेळी मुख्याधिकारी सुनील पवार यांनी मक्तेदार नगरसेवकांचा गोपनीय अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवा, असे सूचविले. त्याचीही विचारणा नागरिकांतून होत आहे.

Web Title: Councilors need awakening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.