खंडपीठासाठी कोल्हापुरात १० ऑगस्टला वकील परिषद, सहा जिल्ह्यातील वकील उपस्थित राहणार
By उद्धव गोडसे | Published: July 16, 2024 06:27 PM2024-07-16T18:27:00+5:302024-07-16T18:28:00+5:30
बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत निर्णय
कोल्हापूर : खंडपीठाच्या मागणीकडे सरकार आणि न्यायालयीन यंत्रणेचे लक्ष्य वेधण्यासाठी १० ऑगस्टला कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे वकील परिषद होईल. जिल्हा न्याय संकुलातील सभागृहात शनिवारी (दि. १६) झालेल्या जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिषदेसाठी सहा जिल्ह्यातील सुमारे अडीच ते तीन हजार वकील उपस्थित राहणार असून, आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होणार आहे, अशी माहिती जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲड. सर्जेराव खोत यांनी दिली.
कोल्हापुरात खंडपीठ होण्याचा निर्णय सध्या मुख्यमंत्री आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टात आहे. यावर तातडीने निर्णय व्हावा, यासाठी कोल्हापुरात वकील परिषदेचे आयोजन करण्याचा निर्णय खंडपीठ कृती समितीच्या ६ जुलैच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार शनिवारी झालेल्या बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत याविषयी चर्चा झाली. ॲड. समीउल्ला पाटील यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी प्रसंगी आमरण उपोषण करण्याची तयारी दर्शवली.
ॲड. प्रकाश मोरे यांनी लोक न्यायालयाच्या कामांवर बहिष्कार टाकण्याचा पर्याय सूचवला. ॲड. सतीश खोतलांडे यांनी जेलभरो करून आरपारची लढाई लढण्याची गरज व्यक्त केली. ॲड. किरण पाटील, अजित मोहिते, रणजीत गावडे, राणाप्रताप सासणे, आसावरी कुलकर्णी यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवावी, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे यांनी परिषद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
सर्वानुमते १० ऑगस्टला कोल्हापुरात वकील परिषद घेण्याचा निर्णय बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी जाहीर केला. तसेच सर्व माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ वकील सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनशी संपर्क साधून परिषद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी असोसिएशनचे बहुतांश माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते.