वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे समुपदेशन--नोटीस पाठवून हजर राहण्याच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:08 PM2019-07-06T12:08:35+5:302019-07-06T12:10:47+5:30
हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस
कोल्हापूर : हेल्मेट न वापरणे, सीट बेल्टचा वापर न करणे त्याचबरोबर वाहतुकीचे नियम तोडणाºया वाहनधारकांची यादी तयार करून त्यांना समुपदेशनाचे धडे दिले जाणार आहेत. त्यासाठी सकाळी नऊ ते १० व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत पोलीस मुख्यालयासमोरील पोलीस गार्डनमध्ये ट्रॅफिक पार्कच्या ठिकाणी समुपदेशन केले जाणार आहे. नोटिसीकडे दुर्लक्ष करून हजर न राहणाºया वाहनधारकांवर आदेश उल्लंघनाची कारवाई केली जाणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली.
शासनाच्या डिसेंबर २०१५ च्या आदेशानुसार हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणाºया वाहनधारकांना रस्ता सुरक्षा आणि नियमांचे समुपदेशन करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. अपघातात गंभीर जखमी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शहर वाहतूक शाखा समुपदेशन करणार आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयासमोर उभारण्यात आलेल्या ट्रॅफिक पार्कच्या ठिकाणी दररोज सकाळी व सायंकाळी नियमभंग केलेल्या वाहनधारकांना बोलावून तेथे माहिती दिली जाणार आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी; तसेच मनोरंजनातून वाहतुकीचे धडे मिळावेत यासाठी ट्रॅफिक पार्क तयार केला आहे. या ठिकाणी स्वयंचलित लाईट सिग्नल, फूटओव्हर ब्रिज, वळणरस्ते तयार केले आहेत. वाहतूक सेवेचे पोलीस त्यांची माहिती देत आहेत. या पार्कचे कामकाज पाहण्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल देसाई यांची कायमस्वरूपी नेमणूक केली आहे.
सहलींचे आयोजन करा
शहरासह ग्रामीण भागांतील शाळांनी मुलांना वाहतुकीचे नियम समजावेत, त्यातून त्यांचे मनोरंजन व्हावे यासाठी ट्रॅफिक पार्कला भेट द्यावी. या मुलांना संपूर्ण पार्क फिरून दाखवणे, माहिती देणे यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचाऱ्यांचीनेमणूक केली आहे; त्यामुळे जिल्ह्यातील शाळा-कॉलेज प्रशासनांनी येथे सहलींचे आयोजन करावे, असे आवाहन निरीक्षक गुजर यांनी केले आहे.