एक हजार कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण -: निवडणूक विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 01:23 AM2019-05-17T01:23:37+5:302019-05-17T01:24:02+5:30

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार असल्याने अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची चिन्हे दिसत आहेत

 Counting of votes for one thousand employees: Election Department | एक हजार कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण -: निवडणूक विभाग

एक हजार कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण -: निवडणूक विभाग

googlenewsNext
ठळक मुद्देहातकणंगलेची मतमोजणी सरनोबतवाडी येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे.

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच केंद्रांतील व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची फेरमोजणी होऊन ‘ईव्हीएम’च्या मतांशी पडताळणी केली जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र टेबलावर होणार असल्याने अंतिम निकाल येण्यास उशीर लागण्याची चिन्हे दिसत आहेत. निकाल लांबणार असल्याचे लक्षात येत असल्याने निवडणूक विभाग दक्ष झाला असून, त्यांनी कर्मचाऱ्यांना प्र्रशिक्षण देऊन निकाल वेळेत कसे पूर्ण होतील, याची तयारी सुरू केली आहे.

गुरुवारी कोल्हापूर व हातकणंगले या दोन मतदारसंघांत दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक हजार निवडणूक कर्मचाºयांना निकाल प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. कोल्हापूर मतदारसंघासाठी केशवराव भोसले नाट्यगृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिलारी व विजया पांगारकर यांनी; तर हातकणंगले मतदारसंघासाठी राजाराम महाविद्यालयातील सभागृहात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता दामले व अमित माळी यांनी पॉवरपॉइंटद्वारे प्रशिक्षण दिले.

मतमोजणीला वेळ कमी लागावा म्हणून एकापाठोपाठ मोजणी करण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे; पण अजून त्याला मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सध्याच्या नियोजनानुसार संपूर्ण मतमोजणीनंतरच व्हीव्हीपॅटची मोजणी होणार आहे. साहजिकच याला वेळ लागणार आहे. क्रॉस व्होटिंगच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर असल्याचे गृहीत धरून कर्मचाºयांना सांगितल्याप्रमाणेच मोजणी प्रक्रिया सुरू ठेवावी. मोठ्या तक्रारी असल्यास संबंधित निवडणूक निरीक्षकांसह अधिकाºयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, अशा सूचनाही केल्या गेल्या.


मतमोजणीसाठी २0 टेबलला मंजुरी निवडणूक आयोग : जिल्हा यंत्रणेचा प्रस्ताव मान्य
कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांत मतदारसंघ व मतदार संख्या जास्त असल्याने १४ ऐवजी २० टेबलवर मोजणी करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्याला गुरुवारी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे कळवले आहे. या निर्णयामुळे टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२0 टेबल लागणार आहेत.
कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारासंघांत मतदार संख्या जास्त असल्याने तसेच येथे राज्यातील उच्चांकी मतदान झाल्याने अंतिम निकाल वेळेत मिळण्यासाठी पूर्वीची १४ टेबलची रचना अपुरी पडत
होती. तसेच ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटवरील मते रॅण्डम पद्धतीने मोजली जाणार असल्याने निवडणूक विभागाने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे टेबल वाढवण्याच्या संबंधी मागणी केली. गुरुवारी निवडणूक आयोगाने कोल्हापूर हातकणंगलेसह मावळ, पनवेल, चिंचवड मतदारसंघांतही जादा टेबल लावण्यास मान्यता दिली आहे.

या निर्णयामुळे या दोन्ही मतदारसंघात प्रत्येकी ६0 याप्रमाणे १२0 टेबल लागणार आहे. त्यात व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र टेबलची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एका मतदारसंघात प्रत्येकी २0 टेबल
असले तरी त्यात व्हीव्हीपॅटसह निरीक्षकांच्या दोन टेबलची भर पडून ती २३ इतकी होणार आहे. साधारणपणे दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल असा अंदाज गृहीत धरून ही टेबलसंख्या वाढवण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे, पण व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र मोजणीमुळे आणखी कालावधी लागणार असल्याने अंतिम निकाल लांबण्याचीच चिन्हे दिसत आहेत.


व्हीव्हीपॅटसाठी स्वतंत्र टेबलांची व्यवस्था
ईव्हीएमबरोबरच या वर्षी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांचीही रॅँडम पद्धतीने तपासणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी पाच याप्रमाणे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ३०, तर हातकणंगले मतदारसंघातील ३० अशा ६० केंद्रांवरील मतांची फेरमोजणी होणार आहे. यासाठी नियमित मतमोजणीसाठी मतदारसंघनिहाय २० टेबल लावण्यात आले आहेत. त्यात व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबलांची सोय आहे. त्यासाठी एक निरीक्षक व दोन सहायक नियुक्त करण्यात येणार आहेत.

मतामध्ये तफावत आढळल्यास फेरमोजणीसह कारवाई
ईव्हीएममधील मते मोजून झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतांशी त्यांची पडताळणी केली जाणार आहे. व्हीव्हीपॅटमधील मते अंतिम मानली जाणार आहेत. या दोन्ही मशीनमधील मतांमध्ये एका जरी मताचा फरक पडला तरी संपूर्ण २० टेबलांवरील मतमोजणी नव्याने केली जाणार आहे. शिवाय हा बेजबाबदारपणा समजून मोजणी करणारे निरीक्षक व सहायक यांच्यावर कारवाई होणार आहे.

उद्या पुन्हा प्रशिक्षण
व्हीव्हीपॅटमुळे मतमोजणी प्रक्रिया क्लिष्ट झाली असल्याने ती अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी गुरुवारी प्रशिक्षण झाल्यानंतर आता उद्या, शनिवारी पुन्हा एकदा लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

चिठ्ठ्या टाकून निवड होणार
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर एका टेबलावर पारदर्शक डब्यामध्ये सर्व मतदारसंघांतील केंद्रांच्या चिठ्ठ्या टाकण्यात येणार आहेत. मतदारसंघनिहाय प्रत्येकी पाच चिठ्ठ्या काढून त्या केंद्रातील इव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतचिठ्ठ्यांची निवडणूक निरीक्षक, राजकीय पक्षनिरीक्षक यांच्यासमोर मोजणी होणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोगाने घालून दिलेल्या अटी-शर्तीस अधीन राहूनच मतदारसंघातील केंद्राची निवड होणार आहे.


मतमोजणीसाठी निरीक्षकांची नेमणूक जाहीर
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन विधानसभा मतदार संघांसाठी एक अशाप्रमाणे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत सहा सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
अलका श्रीवास्तव (चंदगड, राधानगरी), हिना नेताम (कागल, कोल्हापूर शहर दक्षिण), नंदा कुर्शे (करवीर, कोल्हापूर शहर उत्तर) हे अधिकारी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी नेमण्यात आले आहेत. अरुण मिश्रा (इचलकरंजी, शिरोळ), पंकज झा (इस्लामपूर, शिरोळ), तरुण राठी (शाहूवाडी, हातकणंगले) या अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी रमणमळ्यातील बहुउद्देशीय हॉल येथे; तर हातकणंगलेची मतमोजणी सरनोबतवाडी येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून होणार आहे.


‘लोकमत’चे वृत्त खरे
मतमोजणीसाठी २0 टेबलची गरज असल्याने तसा प्रस्ताव आयोगाकडे पाठवल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने ८ मे च्या अंकात दिले होते, तर १४ मेच्या अंकात २0 टेबलवरच मतमोजणी होणार असे ठामपणे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’नेच दिले होते.

Web Title:  Counting of votes for one thousand employees: Election Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.