देश कोणाची जहागीरदारी नाही
By admin | Published: August 8, 2016 12:09 AM2016-08-08T00:09:11+5:302016-08-08T00:09:11+5:30
अब्दुल गफार मलिक : शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज
कोल्हापूर : विविध जातिधर्मांतील माणसांचा हा देश आहे. ती कोणा एकाची जहागीरदारी नाही, हे मुस्लिममुक्त भारत करायला निघालेल्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा देत शिक्षण, आरक्षण, संरक्षणाची मुस्लिम समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या वतीने रविवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
मलिक म्हणाले, मुस्लिममुक्त भारत करण्याची भाषा साध्वी करीत आहेत; पण या देशात १७ टक्क्यांहून अधिक मुस्लिम समाज आहे. समाजात विनाकारण तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. ज्यांना शिवाजी महाराज कळले नाहीत, त्यांना ‘जय शिवाजी, जय भवानी’ची घोषणा देण्याचा अधिकार नाही. त्यांनी खरा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. शरद पवार यांनी खऱ्या अर्थाने शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचे राजकारण व समाजकारण केले असून, सर्वधर्मीय लोकांसाठी त्यांनी उभ्या केलेल्या कामांचा डोंगर दुर्दैवाने महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचू शकला नाही. अल्पसंख्याक सेलच्या कार्यकर्त्यांनी आगामी काळात पवार यांचे विचार पोहोचवत असतानाच बहुजन समाजाला ताकद देण्यासाठी काम करावे, असे आवाहनही मलिक यांनी केले. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी मनोगत व्यक्त केले. अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष मुनीर शेख यांनी स्वागत केले. मुस्ताक सौदागर यांनी सूत्रसंचालन केले. उपमहापौर शमा मुल्ला, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, जिल्हा बॅँकेचे संचालक बाबासाहेब पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, आदी उपस्थित होते. जिल्हा कार्यकारिणी व तालुकाध्यक्ष नियुक्तीची पत्रे यावेळी देण्यात आली.
ेंधर्मयुद्ध नव्हे सत्तायुद्ध
शिवाजी महाराज व अफझलखान यांच्यामध्ये झालेल्या युद्धाला धर्मयुद्धाचे स्वरूप देण्यात आले. हे धर्मयुद्ध नव्हे तर सत्तायुद्ध होते; पण दुर्दैवाने त्याचा चुकीचा प्रचार केल्याची टीकाही मलिक यांनी केली.
शहरातील कार्यकर्त्यांची दांडी
मेळावा शहर व जिल्हा असा संयुक्त होता, पण राजेश लाटकर, शमा मुल्ला वगळता राष्ट्रवादीचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. केवळ व्यासपीठा मागील डिजिटलवर पदाधिकारी; पण व्यासपीठावर मात्र कोणीच नाहीत, अशी अवस्था झाल्याची चर्चा होती.