देशाला ध्येयवादी शिक्षकांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:38 AM2018-03-12T00:38:08+5:302018-03-12T00:38:08+5:30
कोल्हापूर : उद्याच्या भारताचा विचार करता निष्ठावंत आणि ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. त्या दृष्टीने सर्व घटकांनी गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी येथे केले.
मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार यांच्या गौरव समारंभ आणि गौरवग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कौन्सिल आॅफ एज्युकेशनच्या अध्यक्षा रजनीताई मगदूम, तर क्रांती उद्योग व शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष अरुणअण्णा लाड, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे, ‘नॅक’चे सल्लागार डॉ. जगन्नाथ पाटील, माजी महापौर मारुतराव कातवरे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, औद्योगिक, शिक्षण, आदी क्षेत्रांची स्थिती पाहता, देशात येत्या काही वर्षांत अराजकता निर्माण होण्याचे चित्र दिसते. अशा स्थितीत निष्ठावंत, ध्येयवादी शिक्षकांची गरज आहे. मात्र, असे शिक्षक निवृत्त होत आहेत. प्राध्यापकांच्या नियुक्तीबाबतची स्थिती सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे निष्ठावंत आणि ध्येयवादी शिक्षक मिळतील का? हा प्रश्न आहे.
‘नॅक’चे सल्लागार डॉ. पाटील म्हणाले, देशात उच्च शिक्षणाची स्थिती गंभीर आहे. बेरोजगारांची फौज वाढल्यास अराजकता निर्माण होईल. ते टाळण्यासाठी प्राचार्य, शिक्षक आणि संस्थांनी बांधीलकीच्या भूमिकेतून कार्यरत राहावे.
क्रांती समूहाचे अध्यक्ष लाड म्हणाले, कुंभार यांच्यावर क्रांतिअग्रणी जी. डी. बापू लाड यांच्या विचार, संस्कारांचा प्रभाव असल्याने त्यांच्याकडून शिक्षण क्षेत्रात चांगले काम झाले. मगदूम म्हणाल्या, प्राचार्य कुंभार यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी साहित्य, सामाजिक चळवळीत योगदान द्यावे.
लाड यांच्या हस्ते प्राचार्य कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते मानपत्र प्रदान करण्यात आले. यानंतर प्रमुख उपस्थितांच्या हस्ते ‘मराठी साहित्य अवकाशातील संदर्भ’ या गौरवग्रंथाचे आणि ‘दलित साहित्य : काही विचार काही दिशा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, प्राचार्य कुंभार यांच्या पत्नी ज्योती यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी महापौर मारुतराव कातवरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी यशवंतराव चव्हाण, गोपाळ गावडे, दीपक वळवी, मीना बडसकर, मोहन पाटील, आदी उपस्थित होते. डॉ. शिवकुमार सोनाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सुजय पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले.
विचाराच्या वारसातून घडलो
सत्काराने जबाबदारी वाढते. हा सत्कार माझा नसून आपल्या सर्वांचा आहे. जी. डी. बापू लाड, अप्पा लाड, शाहीर निकम, रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांच्या वारशातून घडलो. विद्यार्थी घडवीत गेलो. यापुढेदेखील या विचारांनी कार्यरत राहीन, असे प्राचार्य कुंभार यांनी सांगितले.
नागनाथ कोत्तापल्ले म्हणाले
अभ्यासक चिकित्सक असावा. त्याने विद्यार्थी, समाजाला नवे भान दिले पाहिजे. ते प्राचार्य कुंभार यांनी जाणले आहे.
हा गौरवग्रंथ बुद्धीला धार देणारा आहे.
चांगल्या आर्थिक धोरणांमुळेच देश महासत्ता होईल. देशाची समृद्धी उद्योगांतून वाढते.
देशात मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावणारी यंत्रणा कार्यरत