देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

By admin | Published: November 17, 2015 12:11 AM2015-11-17T00:11:01+5:302015-11-17T00:26:28+5:30

कृषिक्रांतीचे शिलेदार

The country's progressive rock climbers | देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

Next

कौटिल्याने अर्थशास्त्रविषयक विवेचनामध्ये प्रगत राज्याबाबत सत्यवचन लिहून ठेवले आहे. कौटिल्याच्या प्रगत राज्याच्या संकल्पनेप्रमाणे ज्या राज्यातील शेती उत्पादन पावसावर अवलंबून नसते ते राज्य प्रगत असते. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजाने प्रयत्न केलेले कोल्हापूरवासीयांना ज्ञात आहेच. तसेच आपले राज्य, देश प्रगत बनवण्यासाठी धडपडणारा शिलेदार म्हणजे विलासराव साळुंखे!
सांगली जिल्ह्यातील रांजणी गावचे सैनिक सुभेदार बळवंतराव ऊर्फ नानासाहेब साळुंखे यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या रूपात विलासरावांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. बालपणापासूनच विलासराव हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी महाविद्यालयातील पडीक जागेत महिनाभरात सुंदर बगीचा फुलविला होता आणि हा बगीचा अनेक वर्ष साळुंखेची बाग म्हणून ओळखला जात होता.
अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्य केले. विद्युत मोटार वायंडिंगचे वर्कशॉप काढले. पानशेत धरणफुटीमध्ये ते वाहून गेले. त्याच आपत्तीमुळे मोटार रिवायंडिंगची कामे मात्र मोठ्या प्रमाणात येऊ लागली. त्यांनी बळवंत इंजिनिअरिंग वर्कशॉप सुरू केले. याचेच पुढे क्युरेट इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर झाले. त्याच काळात त्यांनी युरोप दौरा केला. क्युरेट इंजिनिअरिंग भरभराटीस येत असतानाच १९७२ चा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे निर्माण झालेले चित्र पाहून विलासराव अस्वस्थ झाले. लोक अन्न आणि पैशासाठी रस्त्यासाठी खडी फोडण्याचे काम करत. दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा ते विचार करू लागले. अशीच पाहणी करत असताना झेंडेवाडी येथे वेगळे चित्र दिसले. झेंडेवाडी येथील लोक आपल्या शेतात काम करत होते. त्यांनी अगोदरच्या वर्षी नालाबंडींगची कामे केली होती. त्यामुळे त्या गावाला दुष्काळाच्या झळा बसल्या नव्हत्या.
ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्याला बारा महिने पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे विलासरावांनी ओळखले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याऐवजी नालाबंडींगची कामे करावीत, असे सुचविले. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. लघुसिंचन विभागाने अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगितले. विलासरावांनी चुणचुणीत मुले निवडून त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण दिले. नालाबंडींगची कामे पुरंदर तालुक्यात सुरू केली. १९७३ मध्ये पडलेल्या पावसात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले.
पाणी प्रश्न समजून घेण्यासाठी ते इस्रायलला गेले. ग्रामगौरव प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण विकासासाठी खेड्यात राहावयाचा निर्णय घेतला आणि नायगावला राहावयास गेले. गावात जागोजागी पाणी अडेल आणि ते गावातच मुरेल याची दक्षता घेतली. बांधावर झाडे लावून जमिनीची धूप थांबवली. सुरुवातीला केवळ एक चतुर्थांश जमिनीवर बागाईत शेती सुरू केली. यशस्वी प्रयोगाचा प्रसार करत नवे ज्ञान आणि प्रकल्प राबवताना ते ज्येष्ठांचे अनुभवही ऐकत. शेतीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना देऊन नवे उत्पन्नवाढीचे मार्ग दाखविले. नायगावात दुधाचा महापूर आला. उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थित नियोजनाने काय होऊ शकते, हे नायगाव प्रकल्पाने दाखवून दिले. पुढे हा नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. शासनाने नायगावच्या धर्तीवर जलसंधारणाची कामे करावीत असे कळविले. त्यांना १९८६ साली जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित केले गेले. या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाने २३ एप्रिल २००२ रोजी इहलोकीचा निरोप घेतला.
- डॉ. व्ही. एन. शिंदे,
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

Web Title: The country's progressive rock climbers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.