सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:24 AM2021-01-20T04:24:02+5:302021-01-20T04:24:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी ...

The coup d'etat of power came fast | सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या

सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यातील ३८६ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या जोडण्या वेगावल्या आहेत. काठावर बहुमत असणाऱ्यांनी सावधानता म्हणून आपल्या सदस्यांना एकत्रित ठेवण्यासाठी सहलीवर पाठविण्याचे नियोजन केले आहे.

गेला महिनाभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. नात्यागोत्यातील संघर्षपूर्ण लढती पहावयास मिळाल्या. स्थानिक सोयीनुसार एकत्रित येऊन आघाड्या झाल्याने पक्षीय राजकारणाची किनार फारशी दिसली नाही. मात्र, भाऊबंदकी उफाळून आल्याने निवडणुकीत ईर्षा पहावयास मिळाली. निवडणूक झालेल्या ३८६ ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी काठावर बहुमत मिळाले आहे. सहा ठिकाणी त्रिशंकू अवस्था झाली आहे. या ठिकाणी सरपंच निवडीपर्यंत आपापले सदस्य सांभाळताना नेत्यांची दमछाक होणार आहे. त्यात सरपंचपदाचे आरक्षण काढायचे आहे. आरक्षण काढल्यानंतर सदस्यांना सभा नोटीस लागू करून त्यानंतर आठ दिवसांनी सरपंच, उपसरपंच निवडी होणार आहेत.

सरपंच निवडीपर्यंत फाटाफुट होऊ नये, यासाठी आघाडी प्रमुखांनी दक्षता घेतली आहे, तर जिथे काठावर बहुमत आहे, त्या ठिकाणी आपल्या गळाला कोणी लागतो, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. नेतेमंडळींनी सत्तेबाबत दावे, प्रतिदावे केल्याने अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही उफाळून येणार आहे.

अपक्षांचा ‘भाव’ वधारला

अनेक गावांत अपक्षांच्या हाती सत्तेची चावी आली आहे. सत्तेचा लंबक त्यांच्या हाती असल्याने त्यांचा ‘भाव’ चांगलाच वधारला आहे. सरपंच, उपसरपंच पदांवर दावा सांगितला जात आहे. नोकरीबरोबर अर्थकारणावरही तडजोडी सुरू आहेत.

प्रशासकांच्या हस्तेच यंदाचे ध्वजारोहण

मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक आहेत. ऑगस्टपासून येथे प्रशासक कामकाज पाहत असून, मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

Web Title: The coup d'etat of power came fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.