अहमदनगरच्या ‘त्या’ प्रेमीयुगुलावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 11:54 AM2022-01-05T11:54:25+5:302022-01-05T11:55:44+5:30
कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमीत दोघांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार केले. दोघांचीही होती ही शेवटची इच्छा.
कोल्हापूर : अहमननगर जिल्ह्यातील तामसवाडी (ता. नेवासा) येथील प्रेमीयुुगुलाने कोल्हापूरात यात्रीनिवासमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. राहुल विश्वासराव मचे (वय २५) व प्रियंका विकास भराडे (२२, दोघेही रा. तामसवाडी) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी रात्री उशिरा दोघांचेही नातेवाईक कोल्हापुरात पोहचले. उत्तरीय तपासणीनंतर रात्री उशीराच कोल्हापुरात त्यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रेमप्रकरणातून राहुल मचे व प्रियंका भराडे हे तामसवाडी येथून ३१ डिसेंबरला कोल्हापुरात आले. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील ताराबाई रोडवर त्यांनी यात्रीनिवासमध्ये खोली घेतली. त्याच दिवशी रात्री त्यांनी छताच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी रात्री उघड झाले.
राहूल हा अविवाहीत होता. प्रियांका हिचे तीन वर्षांपूर्वीच गावातीलच तरुणाशी विवाह झाला होता, तिला एक वर्षाचा मुलगा आहे. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीवरून दोघांच्याही नातेवाईकांशी संपर्क झाला. सोमवारी रात्री दोघांचेही नातेवाईक कोल्हापुरात पोहचले. दोन्हीही मृतदेहाचे उत्तरीय तपासणी केली, त्यानंतर नातेवाईकांनी कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमीत दोघांच्यावर एकत्रित अंत्यसंस्कार केले.