"जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा"; दाम्पत्याची मुलासह नदीपात्रात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 11:15 AM2021-04-16T11:15:04+5:302021-04-16T12:47:45+5:30
Sucide Kolahpur : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे.
कळे/कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील नदीपात्रात १३ वर्षाच्या मुलासह दाम्पत्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले आहे. या सामुहिक आत्महत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. कळे परीसरात शोककळा पसरली आहे. जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी सापडली आहे.
पन्हाळा तालुक्यातील गोठे येथील दिपक शंकर पाटील (वय ४०), वैशाली दिपक पाटील (वय ३५) आणि विघ्नेश दिपक पाटील (वय १४) या तिघांचे मृतदेह येथील कुंभी नदीपात्रात सापडले. आई आणि वडिलांनी चौदा वर्षाच्या मुलाला मध्ये घेउन नदीत उडी टाकून ही आत्महत्या केल्याचे सकाळी उघडकीस आले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातून गुरुवारी रात्री ११ नंतर हे दाम्पत्य बाहेर पडले होते .
गोठे (ता. पन्हाळा) येथील हे दाम्पत्य दोन मुले, वडील एकूण ५ जणसह एकत्र राहत होते. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी गोठे जवळील पाण्याच्या वाटेने चालत जाऊन कुंभी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पात्राजवळ तिघांनी एकत्र दोरीने बांधुन घेतले. सकाळी घराला बाहेरुन कडी असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी घर उघडले असता त्यांना मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली. त्यानंतर गावक-यांनी शोधाशोध केली असता त्यांना कुंभी नदी पात्राजवळ त्यांची चप्पले आढळुन आली. नदी पात्रात शोधाशोध केली असता तिघांचे एकत्र दोरीने बांधलेले मृतदेह आढळुन आले.
सकाळी ९ च्या सुमारास मृतदेह नदीपात्रातुन बाहेर काढण्यात आले. या दाम्पत्याची इ. १० वीच्या वर्गात शिकत असणारी कन्या साक्षी दिपक पाटील ( वय १६ ) ही आपल्या आजोळी चिंचवडे ( ता. करवीर ) गावी गेल्याने या घटनेतुन वाचली असल्याची चर्चा गावक-यात होती.
जीवनात अयशस्वी ठरल्याने स्वखुशीने आत्महत्या
जीवनात अयशस्वी ठरलो, आम्हाला माफ करा, कोणालाही जबाबदार धरु नये. प्रदीप घराकडे लक्ष ठेव. संजु, आक्का, अमर, आण्णाला सांभाळा. कोणीही तक्रार करु नये, मी, वैशाली व विघ्नेश स्वखुशीने आत्महत्या करत आहोत. सर्ज्यादा व दिपक, माफ करा, चुकलो. अशा मजकुराची चिठ्ठी घरी मोबाईलच्या खाली लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली.