अभ्यासक्रमांचे धडे आता ‘चित्रपटा’तून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:59 PM2019-09-05T13:59:44+5:302019-09-05T14:02:41+5:30
दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस वाढतो , हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने महाविद्यालयात ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे. क्लबच्या माध्यमातून चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस वाढतो , हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने महाविद्यालयात ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे. क्लबच्या माध्यमातून चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे धडे दिले जाणार आहेत.
पारंपरिक शिक्षणव्यवस्थेत, शिक्षक शिकवीत असलेल्या स्थळी आणि वेळीच, विद्यार्थ्यांनी उपस्थित असणे आवश्यक असते. कुठल्याही कारणामुळे, जर विद्यार्थी त्याच स्थळी आणि वेळी उपस्थित राहू शकत नसेल, तर तो त्या अभ्यासक्रमापासून वंचित राहू शकतो किंवा काही वेळा शिक्षण घेण्यास पोषक मानसिकता नसते. यामुळे खऱ्या अर्थाने क्लास रूमचा मूळ उद्देश संपतोच. या सर्व गोष्टींचा विचार करीत नावीन्याकडे एक पाऊल टाकत राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमधील इंग्रजी विभागाच्या वतीने ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे.
विद्यार्थ्यांना साहित्य आणि चित्रपटातील सौंदर्य समजावून सांगणे या उद्देशाने या क्लबची स्थापन झाली. इंग्रजी विषयाच्या ऐच्छिक आणि स्पेशल स्तरावर अभ्यासक्रमात सिनेमा आणि वाङ्मय व हिंदुस्थानची फाळणी आणि वाङ्मय असे दोन विषय बी. ए. भाग २ या स्तरावर या वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत.
त्यानुसार बी. ए. भाग १, २ व ३ वर्गांतील इंग्रजी स्पेशल व ऐच्छिक विषयाच्या विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून विविध साहित्यकृतींचा परिचय करून देण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे.
गुणवत्ता वाढणार
क्लबचा माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता तर वाढणार आहे. यासह शिक्षण आनंददायी आणि सहजदेखील होईल. साहजिकच सर्व विद्यार्र्थ्यांना आकलन होणारे हे माध्यम खूप सोयीस्कर आहे. वेगवेगळ्या वर्गांत, एकच विषय, एकच शिक्षक जरी शिकवीत असला तरी प्रत्येक वर्गातील प्रत्येक तासाची गुणवत्ता निश्चितपणे वेगवेगळी असते.
ही गुणवत्ता प्रत्यक्ष तासाच्या वेळी असलेल्या शिक्षकाच्या आसपासच्या वेगवेगळ्या भौगोलिक व मानवी परिस्थितीवर अवलंबून असते. याच सर्व गोष्टींचा विचार करून या क्लबची स्थापना केली आहे.
हे चित्रपट, नाटक दाखविणार
अंगूर (कॉमेडी आॅफ एरर्स शेक्सपीअर), ट्रेन टू पाकिस्तान (खुशवंतसिंग), महानिर्वाण (सतीश साळेकर), डिसग्रेस (जे. एम. कोडजी), बारोमस ( सदानंद देशमुख), इव्होल्युशन आॅफ सिनेमा ( माहितीपट), पार्टिशन आॅफ इंडिया (माहितीपट) दाखविले जाणार आहे.
पंधरा दिवसांतून एकदा हा उपक्रम राबविला जाणार आहे. अभ्यासक्रमांच्या संबंधित आम्ही चित्रपट दाखविणार आहे. यासह माहितीपट, मुलाखत, नाटक दाखविले जाणार आहे. ती इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये असतील.
- प्रा. डॉ. एस. एम. साठे
इंग्रजी विभागप्रमुख