पालिका न्यायालयात दाद मागणार !
By admin | Published: January 6, 2015 12:43 AM2015-01-06T00:43:34+5:302015-01-06T00:50:34+5:30
प्रांतकचेरी जागेचा वाद : गडहिंग्लज नगरपालिका सभेत निर्णय
गडहिंग्लज : ५४ वर्षांपूर्वी प्रांतकचेरी सुरू करण्यासाठी नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या धर्मशाळा इमारतीसह खुल्या जागेला ‘वहिवाट’दार म्हणून उपविभागीय अधिकारी यांचे नाव बेकायेदशीररीत्या परस्पर दाखल केल्याबद्दल येथील सहायक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार व भूमिअभिलेख उपअधीक्षक सविता माळी यांचा निषेध नोंदवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचा ठराव नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने झाला.
१२८ वर्षांपासून नगरपालिकेच्या वहिवाटीतील सि. स. नं. १३२६ पैकी भाड्याने घेण्यात आलेल्या १६२० चौ. मी. क्षेत्रास वहिवाटदार म्हणून उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज यांचे नाव लावण्यात आल्याबद्दल विचारविनिमयासाठी ही विशेष सभा झाली. थकीत भाडेदेखील प्रांताधिकाऱ्यांनी अदा करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे होत्या.
तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आदेश व शासन निर्णयाचा भंग आणि कायदा धाब्यावर बसवून नगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात व्यापारी संकुलासाठी आरक्षित प्रांतकचेरीच्या जागेला बेकायदेशीररीत्या ‘वहिवाट’ नोंद करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व बेकायदेशीर झालेली वहिवाट नोंद रद्द करावी आणि याप्रश्नी उच्च न्यायालयात दाद मागावी, असा ठराव दीपा बरगे यांनी मांडला.
त्यास स्वाती कोरी यांनी अनुमोदन दिले.कोरी म्हणाल्या, पहिल्या व दुसऱ्या विकास आराखड्यात प्रांतकचेरीच्या जागेवर व्यापारी संकुलासाठी ठेवण्यात आलेल्या आरक्षणाला प्रांतांनी कोणतीही हरकत घेतलेली नाही. सर्व कागदपत्रे पालिकेच्या बाजूने आहेत. याप्रश्नी उच्च न्यायालयातच दाद मागावी.
सय्यद म्हणाले, बेकायदा फेरफार केल्याप्रकरणी निलंबित करून माळी यांची चौकशी करा.या विषयीच्या चर्चेत किरण कदम, नरेंद्र भद्रापूर, राजेश बोरगावे, बसवराज खणगावे, दादू पाटील यांनी भाग घेतला. प्रांत कचेरी जागेच्या वादाचा प्रश्न चांगलाच गाजला. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्यासह नगरसेवक व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘लोकमत’चे अभिनंदन
‘प्रांतकचेरी’च्या जागेसंदर्भात सर्वप्रथम वाचा फोडून गडहिंग्लजनगरीच्या हिताच्या दृष्टिकोनातून याप्रश्नी रोखठोक पाठपुरावा केल्याबद्दल विरोधी नगरसेवक राजेश बोरगावे यांनी ‘लोकमत’च्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास सत्ताधारी नगरसेवक सय्यद यांनी त्यास अनुमोदन दिले. याप्रश्नी बंद व मोर्चातील सहभागी नागरिकांचेही आभार मानले.
सत्ताधारी-विरोधकांची एकजूट
आरोप-प्रत्योरापातून नेहमी एकमेकांना कोंडीत पकडणाऱ्या सत्ताधारी व विरोधकांची एकजूट आजच्या सभेत दिसून आली. बेकायदेशीर फेरफार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा ठराव सत्ताधारी नगरसेविका दीपा बरगे यांनी मांडला. त्यास विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी यांनी अनुमोदन दिले.
मुश्रीफसाहेबांनी अजूनही लक्ष घालावे
यापूर्वी जनता आघाडीने व सत्तेवर असणाऱ्या राष्ट्रवादीनेदेखील पाठपुरावा केला; मात्र प्रांतकचेरीची जागा हस्तांतरित झाली नाही. राज्यात १५ वर्षे काँगे्रस व राष्ट्रवादीची सत्ता आणि मुश्रीफसाहेब मंत्री असताना ही मोक्याची जागा पालिकेला मिळायला हवी होती. त्यांनी अजूनही लक्ष घातल्यास हे घडू शकते. यासाठी बेमुदत उपोषणालादेखील बसण्याची आपली तयारी असून, सर्व प्रकारच्या लढाईत जनता दल-जनसुराज्य आघाडीचा सक्रिय सहभाग राहील, अशी ग्वाही विरोधी पक्षनेत्या कोरी यांनी दिली.