प्रशांत कोरटकरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, कळंबा जेलमधील मुक्काम वाढला
By भीमगोंड देसाई | Updated: April 1, 2025 17:55 IST2025-04-01T17:53:48+5:302025-04-01T17:55:57+5:30
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा नागपूरचा ...

प्रशांत कोरटकरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, कळंबा जेलमधील मुक्काम वाढला
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा नागपूरचा प्रशांत मुरलीधर कोरटकर याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. चौथे सह कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. सुरक्षेच्या कारणावरून प्रत्यक्ष उपस्थित न ठेवता कोरटकर यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस हजर ठेवले. सरकारतर्फे ॲड. सूर्यकांत पोवार यांनी प्रत्यक्ष हजर राहून तर सावंत यांचे वकील ॲड. असीम सरोदे आणि कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला.
कोरटकर सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.. त्याला कळंबा कारागृहातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीत कोरटकर याचे वकील घाग म्हणाले, सावंत यांनी समाजमाध्यमात संभाषण व्हायरल केल्यानंतर कोरटकर यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिली. त्यात त्यांनी सावंत यांच्याशी माझी ओळख नाही. माझा मोबाइल हॅक झाला होता. त्यामुळे माझा आवाज काढून त्यांच्याशी कोणी तरी संभाषण केले असावे, असे म्हटले आहे. कोरटकर आणि फिर्यादी यांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. कोरटकर यांनी समाजात तेढ निर्माण केलेली नाही. म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा.
सरकारी वकील पोवार म्हणाले, कोरटकर याचा मोबाइल हॅक झाला हा दावा खोटा आहे. राष्ट्रपुरुषांचा त्याने हेतूपुरस्सर अवमान केला आहे. त्याचा हेतूच समाजात अशांतता, तेढ निर्माण करण्याचा होता. मराठा आणि ब्राह्मण समाजात दरी निर्माण होईल, असे तो बोलला आहे. अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. तो पत्रकार असल्याने ओळखीच्या माध्यमातून पुढील तपासात दबाव आणून अडथळा आणू शकतो. साक्षीदारांना धमकावू शकतो. जामीन झाला तर समाजात चुकीचा संदेश जाईल.
पुन्हा फरार होण्याची शक्यता
कोरटकर याने सावंत यांना फोन करून धमकी दिली. राष्ट्रपुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले. त्यानंतर तो वेगवेगळ्या राज्यात प्रवास करून पोलिसांना चकवा दिला. महिन्यानंतर म्हणजे २५ मार्चला त्याला अटक झाली आहे. जामीन झाल्यानंतरही तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
सावंत यांची लेखी माफी मागावी
सावंत हे इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याची चुकीची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे. याबद्दल कोरटकर याने सावंत यांच्या माफीचे लेखी पत्र न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी ॲड. सरोदे यांनी केली. कोरटकर याने जामीन अर्जावरही वेगवेगळ्या सह्या केल्या आहेत. त्याच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष असल्याचे पुढे आले आहे. घराला पोलिस संरक्षण असतानाही तो पळून गेला असल्याचे सरोदे यांनी सांगितले. न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. वकील, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.