निर्भया पथकाने धरपकड करीत रोडरोमिओंची केली चांगलीच धुलाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 01:35 PM2020-02-13T13:35:01+5:302020-02-13T13:39:23+5:30
शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉप परिसरात पंधरा ते वीस तरुणांचे टोळके नेहमी उभे राहून महाविद्यालयीन तरुणींचा पाठलाग करून त्यांची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे आल्या होत्या
कोल्हापूर : शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉप परिसरात घोळका करून उभे राहून तरुणींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंची निर्भया पथकाने धरपकड करीत चांगलीच धुलाई केली. बुधवारी सकाळी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तरुणांनी चांगलाच धसका घेतला आहे; तर युवतींनी या कारवाईचे स्वागत केले आहे. दिवसभरात ४५ जणांवर प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई केली. तर १० रोडरोमिओंविरोधात न्यायालयात खटले दाखल केले. दोघा तरुणांवर अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली.
शहरातील शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉप परिसरात पंधरा ते वीस तरुणांचे टोळके नेहमी उभे राहून महाविद्यालयीन तरुणींचा पाठलाग करून त्यांची छेड काढत असल्याच्या तक्रारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना कारवाईचे आदेश दिले होते. महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र निर्भया पथक कार्यरत आहे.
पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक अनिता मेणकर यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या पार्श्वभूमिवर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात धडक मोहीम सुरू केली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास मंगळवार पेठ, शिवाजी पेठ परिसरातील शाळा, कॉलेजच्या परिसरात दुचाकी फिरविणाºया, गटागटाने टिंगलटवाळी करणाºया तरुणांकडे चौकशी करीत त्यांची जाग्यावरच धुलाई केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अन्य तरुण विविध दिशांनी सैरावैरा धावत सुटले. अधिकाऱ्यांसह महिला पोलीस साध्या वेशात असल्याने कॉलेज परिसरात उभे असलेले तरुण बेसावध होते.
हातात सापडेल त्याला पोलिसी खाक्या दाखवीत त्यांच्यावर कारवाई केली. यावेळी काही तरुणांनी हात जोडून पोलिसांना कारवाई न करण्याविषयी विनंती केली. त्यांच्या पालकांना संबंधित पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोर या तरुणांना समज देत दंडात्मक कारवाई केली. छेडछाड करणाºया दहा तरुणांच्या विरोधात न्यायालयात खटले पाठविले आहेत.
महिला व तरुणींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक चोवीस तास तत्पर आहे. गेल्या दोन दिवसांपासून शाळा, महाविद्यालय परिसरात धडक मोहीम राबवून रोडरोमिओंवर कठोर कारवाई केली आहे. ही मोहीम यापुढे अशीच सुरू राहणार आहे.
अनिता मेणकर : निर्भया पथक प्रमुख