न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी लावणा-यांवर कठोर कारवाई पोलिसांना करावीच लागणार - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 11:31 PM2017-08-26T23:31:33+5:302017-08-26T23:31:43+5:30
न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणा-यांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून, पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांना कारवाई करावीच लागणार आहे. डॉल्बी लावणा-यांची कोणत्याही परिस्थितीत हयगय करणार नसून, पोलीस कठोर भूमिका बजावतील, असा इशारा महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
शेतकरी तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, समाज एकत्र यावा, त्यातून प्रबोधन व्हावे, यासाठी लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सवासारख्या आनंदाच्या क्षणी गाणी कोणती लावावीत, वाद्ये कोणती वाजवावीत, हा मंडळांचा प्रश्न आहे, पण त्यामुळे समाजाला त्रास व धोका होईल, असे करणे चुकीचे आहे. गणेशोत्सवाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याने नाना पाटेकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्यांच्या माध्यमातून प्रबोधन सुरू आहे. तरीही डॉल्बी लावण्याचे प्रकार घडत असतील, तर काय बोलावे? आगामी दहा दिवस गणेशोत्सवासह विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पडावी, यासाठी सगळ्या मंडळांसाठी परिपत्रक काढणार आहेत.
डॉल्बीबाबतची कलमे पाहिली, तर त्यामध्ये अनेक तरुणांची आयुष्ये बरबाद होतील. पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आहे. त्यामुळे मंडळांनी कायदा समजावून घेऊन शांततेत गणेशोत्सव पार पाडावा.
- चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री