समीरला नऊपर्यंत न्यायालयीन कोठडी

By admin | Published: September 29, 2015 12:52 AM2015-09-29T00:52:34+5:302015-09-29T00:58:25+5:30

पानसरे हत्येप्रकरणी मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी रुद्र पाटील हा ‘मास्टर मार्इंड’ असल्याचे बारा दिवसांच्या तपासामध्ये कसलाही पुरावा पोलिसांकडे नाही,

Courtroom closure till Sameer 9 | समीरला नऊपर्यंत न्यायालयीन कोठडी

समीरला नऊपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित ‘सनातन’ संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याला येथील प्रथमवर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांनी ९ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनी त्याची कळंबा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. समीरची पोलीस कोठडीची मुदत सोमवारी (दि. २८) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी फिर्यादीचे खासगी वकील विवेक घाटगे यांनी युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीच्या वकिलांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे काही वेळ न्यायालयात गोंधळ उडाला. अत्यंत तणावाच्या वातावरणात सोमवारी ही प्रक्रिया झाली.दरम्यान, पानसरे हत्येप्रकरणी मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित आरोपी रुद्र पाटील हा ‘मास्टर मार्इंड’ असल्याचे सांगितले जात आहे; परंतु बारा दिवसांच्या तपासामध्ये रुद्र पाटीलबाबत कसलाही पुरावा पोलिसांकडे नाही, असे आरोपीचे वकील समीर पटवर्धन यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केले. त्यास सरकारी वकील किंवा

‘ब्रेन मॅपिंग’वर आज तपास अधिकाऱ्यांनी कोणतेही प्रत्युत्तर केले नाही. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी म्हणून सनातन संस्थेचा सांगलीतील साधक समीर गायकवाड याला सांगलीतच दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली. त्याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला मुख्य तपास अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्या यांनी सोमवारी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालय दोन्ही बाजूंच्या वकिलांनी खचाखच भरले होते. न्यायाधीश डांगे यांनी संशयिताला नाव विचारले असता त्याने समीर विष्णू गायकवाड असे सांगितले. त्यानंतर पोलिसांविरोधात तुझी काही तक्रार आहे का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने काही नाही असे उत्तर दिले. त्यानंतर तपास अधिकारी चैतन्या यांनी गणेशोत्सवामुळे तपास कामास वेळ मिळालेला नाही. त्याच्या मोबाईल सीमकार्डवरून अन्य व्यक्तींचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती केली. सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी संशयित समीरच्या घरझडतीमध्ये मिळालेल्या २३ मोबाईलसंदर्भात चौकशी केली असता अजय प्रजापती यांनी समीरकडे दुरुस्तीसाठी मोबाईल दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रजापती यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आणखी सहा ते सात मोबाईल समीरकडे असल्याचे सांगितले. २३ मोबाईलपैकी एका मोबाईलचा ईएमआय नंबर पडताळला असता तो फोंडा-गोवा येथील रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधक म्हणून सेवा करणाऱ्या श्रद्धा पवार हिचा असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी श्रद्धाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता नीलेश चितळे याने तिचा मोबाईल दुरस्तीसाठी समीरकडे दिल्याचे सांगितले. तसेच तिचे २००१-०२ मध्ये आश्रमातील साधक विनय बाबूराव पवार याच्याशी २००६ मध्ये लग्न झाले.
त्यानंतर २००९ पासून तो बेपत्ता असल्याचे सांगितले. समीर प्रजापतीकडून मोबाईल दुरुस्तीसाठी घेतल्याचे सांगत आहे, तर श्रद्धा पवार हिने नीलेश चितळे हादेखील समीरला मोबाईल दुरुस्तीसाठी देत असल्याचे सांगितले. समीर हा वेगवेगळी व दिशाभूल करणारी माहिती सांगत असल्यामुळे उर्वरित १६ ते १७ मोबाईल चितळेने समीरला दिले आहेत का? याबाबत तपास करायचा आहे. २३ मोबाईलमध्ये ३१ सीमकार्ड वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी १७ मोबाईलधारकांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली आहे. उर्वरित मोबाईलधारकांचा तपास अपुरा आहे. सार्वजनिक गणेश विसर्जन बंदोबस्तामध्ये तीन दिवस गेल्याने तपास करता आलेला नाही. त्यामुळे संशयिताच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करावी, असा युक्तिवाद मांडला.
संशयित समीरचे वकील सांगली येथील अ‍ॅड. समीर पटवर्धन यांनी पोलिसांनी बारा दिवस काय तपास केला, त्यांचे मागील पानावरून पुढे असे सुरू आहे. त्यांना बारा दिवसांत काही हाती लागले नाही, तर दोन दिवसांत काय लागणार. यापूर्वी जी कारणे यादीमध्ये दिली होती, तीच कारणे आजही आहेत. पोलीस खुनाचा तपास करतात की मोबाईलचा हे आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. मोबाईलच्या मालकांचा शोध घ्यायचा असेल तर संबंधित सीमकार्डच्या कंपन्यांना विचारा, त्यासाठी संशयित आरोपीची काय आवश्यकता आहे. श्रद्धा पवारने दिलेल्या जबाबामध्ये नीलेश चितळे हा साधक आहे. तो समीरकडे मोबाईल दुरुस्तीसाठी देत होता म्हणजे तो त्याचा व्यवसाय होता. तो त्यांना मोफत दुरुस्ती करून देत होता. पोलीस फक्त सांगोपांग करून यादी न्यायालयासमोर ठेवत आहेत. गुजरातमधील फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट लवकरच आम्हाला मिळणार आहे, असे तपासी अधिकारी एस. चैतन्या यांनी २६ तारखेच्या खटल्याप्रसंगी सांगितले होते. तो अद्याप प्राप्त झालेला नाही. समीरची आवाजाची टेस्ट घेतली आहे, त्याचा रिपोर्ट कधी यायचा तेव्हा येईल. त्यासाठी समीरच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. पोलिसांनी चितळे, श्रद्धा पवार यांचा जबाब घेतला आहे. श्रद्धाचा पती विनय बेपत्ता आहे. या गुन्'ाशी त्याचा काहीही संबंध नाही. मडगाव बॉम्बस्फोटापासून रुद्र पाटील हा फरार आहे. रुद्र हा समीरचा मित्र आहे, म्हणून समीरही गुन्हेगार आहे हा दुबगली न्याय झाला. मडगाव बॉम्बस्फोटाशी समीरचा काहीही संबंध नाही. तपास पथकाच्या रिपोर्टमध्ये असा कोठेही उल्लेख आतापर्यंतच्या तपासामध्ये आलेला नाही. तपास यंत्रणेचे तपासाचे फक्त नाटक सुरू आहे. स्वत:ची पाठ थोपटून घेणे, फुशारकी मारणे एवढेच काम ते करीत आहेत. गणेशोत्सव बंदोबस्तामुळे तपासासाठी वेळ मिळाला नाही असे पोलिसांचे मत आहे; परंतु पानसरे हत्याप्रकरणी स्वतंत्रपणे ‘एसआयटी’ पथकाची स्थापना केली आहे. त्यामुळे बंदोबस्ताचे कारण पुढे करून पोलीस कोठडीची मागणी करणे या मताशी मी सहमत नाही. संशयित समीरच्या पोलीस कोठडीची मागणी रद्द करून न्यायालयीन कोठडी द्यावी, जेणेकरून पोलीस तपास त्यांच्या मर्जीपणे करू शकतील. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश डांगे यांनी संशयित आरोपीची ९ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. यावेळी न्यायालय परिसरात प्रचंड तणावपूर्ण परिस्थिती असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुनावणीस पानसरे कुटुंबीयांसह भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

संशयित समीर हा पहिल्यापासून तपासात सहकार्य करीत नाही. काही वेळा जी माहिती सांगेल ती दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे त्याच्या ‘ब्रेन मॅपिंग’ तपासणीची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज पोलिसांनी सोमवारी न्यायाधीश डांगे यांच्याकडे केला. त्यावर आज, मंगळवारी दुपारी सुनावणी होणार आहे.


आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
१) पोलिसांनी १२ दिवसांत काहीही तपास केला नाही.
२) पोलीस खुनाचा तपास करतात की मोबाईलचा.
३) समीर साधकांचे मोबाईल मोफत दुरुस्त करून देत होता.
त्यामुळे त्याच्याकडे मोबाईल दुरुस्तीसाठी येत होते.
४) मोबाईलच्या मालकांना शोधण्यासाठी आरोपीच्या पोलीस
कोठडीची काय गरज आहे.
५) रुद्र पाटीलशी मैत्री म्हणजे समीरही गुन्हेगार नव्हे.
६) तपास यंत्रणा फक्त नाटक करीत आहे.
७) नेहमी त्याच कारणांची यादी न्यायालयासमोर हजर केली जात आहे.
८) तपास कामासाठी आरोपीची काहीच गरज नाही.
९) ‘ईश्वरी राज्य आलं पाहिजे,’ हे ‘सनातन’चे विचार रुजविण्याचे
काम तो करीत असल्याचे पोलीस सांगत होते. त्याचा तपास काय
केला, हे यादीमध्ये नाही.
१०) ठाणे येथे तपास करण्यासाठी यापूर्वी पोलिसांनी पोलीस कोठडी मागवून घेतली होती. त्याचा तपास केला की नाही, याचा रिपोर्ट यादीमध्ये नाही.
११) समीर गायकवाडला पानसरे हत्येप्रकरणात गुंतविण्याचा
प्रयत्न पोलीस करीत आहेत.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद
१) ३१ पैकी आणखी सहा ते सात मोबाईल समीरकडे आहेत, त्याचा तपास होणे आवश्यक आहे.
२) अजय प्रजापती व नीलेश चितळे हे मोबाईल दुरुस्तीसाठी पुरवीत असल्याचे पुढे आले आहे. नेमके कोण मोबाईल पुरवीत होते.
३) श्रद्धा पवारचा पती विनय बाबूराव पवार हा २००९ पासून बेपत्ता आहे. त्याची चौकशी होणे गरजेचे आहे.
४) गणेशोत्सवामुळे तपास कामासाठी वेळ मिळालेला नाही, त्यासाठी वाढवून पोलीस कोठडी मिळावी.
५) समीरचे सांगलीतील मोबाईल दुरुस्तीचे दुकान २००८ पासून बंद असताना मोबाईल दुरुस्तीला आले कसे? हा प्रकार संशयास्पद आहे.
६) गुन्'ात वापरलेले पिस्तूल, गोळ्या व मोटारसायकल यांची हत्येनंतर काय विल्हेवाट लावली, याचा तपास आवश्यक.


अखेर सत्तेचे गुलाम बनले
समीर गायकवाड याला पोलीस कोठडी मिळण्यासाठी पानसरे कुटुंबीयांच्या वतीने वकिलांनी जोरदार तयारी केली होती; परंतु पोलिसांनी गेले बारा दिवस ठोस असा पुरावा पुढे आणला नसल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाली. अखेर पोलीसच सत्तेचे गुलाम बनल्याची टीका वकिलांसह काही कार्यकर्ते न्यायालय परिसरात करीत होते.

Web Title: Courtroom closure till Sameer 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.