दुभाजक पथदिव्यांच्या खांबावरील झाकणे गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:14+5:302021-04-20T04:24:14+5:30

अमर पाटील : कळंबा दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या संभाजीनगर सिग्नल ते कळंबा ग्रामपंचायत, क्रेशेर चौक ते ...

The cover on the divider streetlights disappears | दुभाजक पथदिव्यांच्या खांबावरील झाकणे गायब

दुभाजक पथदिव्यांच्या खांबावरील झाकणे गायब

Next

अमर पाटील : कळंबा

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या संभाजीनगर सिग्नल ते कळंबा ग्रामपंचायत, क्रेशेर चौक ते आपटेनगर, हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज, संभाजीनगर ते विद्यापीठ, संभाजीनगर ते क्रेशेर चौक मार्गावरील दुभाजकांच्या पथदिव्यांच्या खांबावरील झाकणे गायब होऊन यातील विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल्स बाहेर लोंबकळत आहेत. या उघड्या मीटर बॉक्समुळे शॉक बसून एखादी दुर्घटना घडून जीवावर बेतू शकते. त्यामुळे या खांबांवरील झाकणे बसवावीत, अशी मागणी होत आहे. उपनगरात रस्ते रुंदीकरण करतेवेळी मोठ्या रस्त्याच्या दुतर्फी दुभाजकांवर ठरावीक अंतरावर पथदिवे बसवण्यात आले.

याच पथदिव्यांच्या खांबातून दिव्यापर्यंत वीजपुरवठा केला जातो. जमिनीपासून ते खांबापर्यंत ठरावीक अंतरावर दिव्यांचे स्वीच बसविण्यात आले आहेत. त्यावर सुरक्षिततेसाठी झाकणे बसविली आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी यातील बहुतांश झाकणे चोरीला गेल्याचे दिसत आहे. काही ठिकाणी निव्वळ तारा गुंडाळून ठेवण्यात आल्या आहेत.

बऱ्याचदा नागरिक दुभाजकावरून उडी मारून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. विद्युत पुरवठा सुरू असल्यास उघड्या तारांना स्पर्श होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. रिफ्लेक्टर लावण्यात आले नाहीत. शिवाय काहीवेळा पथदिवे बंद असतात, त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून पथदिव्यांची नियमित तपासणी व दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

कोट : उपनगरात जीर्ण अथवा खराब झालेले पथदिवे बदलण्यासाठी लोकप्रतिनिधी आग्रही असतात; पण सुस्थितीत असणाऱ्या या विद्युत खांबांवरील धोकादायक झाकणे गायब झाल्याने संबंधित प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. विद्या युवराज तेली, प्रभाग ८१ जीवबानाना पार्क.

फोटो: १९ कळंबा पथदिवे झाकणे

संभाजीनगर ते क्रेशेर चौक रस्त्याच्या दुभाजकांवरील पथदिव्यांच्या खांबांवरील झाकणे गायब झाली असून, उघड्या वायरिंगमुळे धोकादायक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

Web Title: The cover on the divider streetlights disappears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.