टोल स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालू
By admin | Published: November 23, 2014 12:54 AM2014-11-23T00:54:29+5:302014-11-23T00:55:59+5:30
सार्वजनिक बांधकाममंत्री : वेळ द्या; टोल शंभर टक्के घालवू
कोल्हापूर : राज्यात सध्या भाजप सरकार अस्थिरच्या अवस्थेत आहे. कोणत्याही हिंसात्मक मार्गाने टोलविरोधी आंदोलन करू नका. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरच्या टोलवसुलीसाठी परवानगी दिली असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कायदेशीर बाजू मांडून टोलवसुलीला स्थगिती आणण्यासाठी साकडे घालू, अशी माहिती आज, शनिवारी सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिली.
सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीची बैठक ताराबाई पार्क येथील शासकीय विश्रामगृह येथे आज सकाळी आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रा. एन. डी. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, टोल आंदोलनाच्या चळवळीत आम्हीसुद्धा होतो. कोणीही कायदा हातात घेऊ नका. काल, शुक्रवारी प्रभारी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी याबाबत चर्चा केली. कळंबा व उचगाव टोलनाक्यांवर जो प्रकार झाला आहे, तो समितीतील कार्यकर्त्यांनी केलेला नाही. २० डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. ऊसतोड मजुरांचे, उसाचे भाव, दुष्काळ असे अनेक प्रश्न आहेत. राज्यावर ५२ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे; तर २६ हजार कोटी महसुलाची तूट आहे.
कऱ्हाड येथे उद्या, रविवारी मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा आहे. त्यावेळी टोलसंदर्भातील भूमिका मांडू. एन. डी. पाटील म्हणाले, कोणत्याही पक्षाचे सरकार असू दे; टोल हटविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तुम्हाला टोलचा निर्णय द्यावाच लागेल. बैठकीस रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे यांच्यासह समितीतील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)