बेघरांसाठी कसबा बावड्यात कोविड केअर निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:24 AM2021-04-22T04:24:23+5:302021-04-22T04:24:23+5:30
कोल्हापूर : महानगरपालिका, अवनि संस्था, एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शहरातील पाचवे कोविड केअर निवारा केंद्र कसबा बावडा ...
कोल्हापूर : महानगरपालिका, अवनि संस्था, एकटी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर शहरातील पाचवे कोविड केअर निवारा केंद्र कसबा बावडा येथे सुरु करण्यात आले आहे.
या कोविड केअर निवाऱ्यात दाखल होणाऱ्या बेघरांचा स्वॅब तपासून त्यांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार याबरोबरच रोगप्रतिकारक औषधे, कोरोना लस देण्याचे काम केले जाणार आहे. त्यांच्या स्वॅबचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना इतर निवाऱ्यामध्ये दाखल केले जाणार आहे, जर पॉझिटिव्ह अहवाल आला तर तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले जाणार आहे.
महानगरपालिका व एकटी संस्थेतर्फे कोल्हापूर शहरात बेघरांसाठी चार शहरी निवारा केंद्र कार्यान्वित आहेत. या निवाऱ्यांमार्फत शहर व उपनगर भागात महिन्यातून दिवसा व रात्री बारावेळा सर्वेक्षण करुन बेघरांना निवाऱ्यात दाखल केले जाते. पण कोरोनाच्या काळात या कार्यात अडथळा येत आहे. महामारीमुळे नव्याने दाखल होणाऱ्या बेघरांपासून आधीच वास्तव्याला असलेल्या बेघरांना धोका संभवू शकतो, म्हणूनच तात्पुरते पाचवे निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे.