गडहिंग्लज नगरपालिकेचे कोविड सेंटर आठवडाभरात सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:24 AM2021-05-11T04:24:12+5:302021-05-11T04:24:12+5:30
राम मगदूम। लोकमत न्यूज नेटवर्क गडहिंग्लज : दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेऊन गडहिंग्लज शहरातील नागरिकांसाठी नगरपालिकेतर्फे कोविड काळजी ...
राम मगदूम।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेऊन गडहिंग्लज शहरातील नागरिकांसाठी नगरपालिकेतर्फे कोविड काळजी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, आठवडाभरात हे केंद्र सुरू होईल, अशी माहिती पाणीपुरवठा व आरोग्य समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरी म्हणाले, गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच शहरासह परिसरात कोरोनाचा संसर्ग आणि फैलाव होऊ नये, याची दक्षता नगरपालिका गांभीर्याने घेत आहे. त्यासाठी जनता कर्फ्यूसह जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला विक्रीच्या वेळेचे नियोजन, बाधितांच्या घराचे निर्जंतुकीकरण आणि शहरांसह गडहिंग्लज विभागातील कोरोनाबाधित मृतांवरील मोफत अंत्यसंस्काराची व्यवस्था पालिकेने केली आहे.
दरम्यान, दुसऱ्या लाटेत कोरोनाचा झपाट्याने होणारा फैलाव आणि वाढत्या रूग्णसंख्येमुळे शासकीय व खासगी आरोग्य यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. परंतु, स्वत:चा दवाखाना नसल्यामुळे नगरपालिकेला कोविड रूग्णांना सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे वैद्यकीय उपचारांबरोबरच समुपदेशनाच्या सोयीसह कोरोना रूग्णांची पुरेपूर काळजी घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
यासाठी आघाडीचे नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांचे मार्गदर्शन तर नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी, पक्षप्रतोद बसवराज खणगावे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व सर्व नगरसेवकांचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------
* ४० बेडची सुविधा
गडहिंग्लजमधील नगरपालिकेच्या पॅव्हेलियन व्हॉलमध्ये ४० बेडचे कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्याठिकाणी रूग्णांना मोफत औषधोपचार, जेवण, चहा-नाश्ता आणि योगा व समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करण्यात येईल.
हृदयरोग तज्ज्ञासह अन्य तीन डॉक्टर आणि अनुभवी परिचारिका व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. त्यांचे मानधन नगरपालिकेच्या फंडातून दिले जाईल, असेही कोरी यांनी सांगितले.
-----------------------
* ऑक्सिजन बेडचीही तयारी
शासनाने पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर्स उपलब्ध करून दिल्यास हे केंद्र ऑक्सिजन बेडमध्ये रूपांतरित करण्याची पालिकेची तयारी आहे, असेही कोरी यांनी सांगितले.
-----------------------
* ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘गडहिंग्लज नगरपालिकेने कोविड काळजी केंद्र सुरू करावे’ या मथळ्याखाली वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी (दि. १०) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन हे केंद्र सुरू करण्याची तयारी नगरपालिकेने युद्धपातळीवर सुरू केली आहे.
-----------------------
*
महेश कोरी : १००५२०२१-गड-०३