गाय दूध खरेदी दरात संघांकडून कपात सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:50 AM2017-11-13T00:50:44+5:302017-11-13T00:51:54+5:30
कोल्हापूर : अतिरिक्त गाय दुधामुळे राज्यातील दूध संघांनी खरेदी दरात कपातीचा सिलसिला कायम ठेवला आहे. सोनाई दूध संघ, इंदापूर (पुणे) यांनी दुसºयांदा प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली असून, सध्या त्यांचा ३.५ फॅटला प्रतिलिटर २० रुपये ५० पैसे दर राहिला आहे. या संघाबरोबरच ‘सोलापूर’, ‘महानंदा’, ‘पुणे’, ‘बारामती’, ‘औरंगाबाद’, ‘कोयना’ दूध संघांचे दर ही २१ ते २२ रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पावडरचे दर घसरल्याने गाय दुधाचा पेच निर्माण झाला असून अतिरिक्त दुधामुळे संघाचा तोटा वाढला आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून राज्यातील दूध संघांनी गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या आदेशानुसार ३.५ फॅटच्या गाय दुधास २७ रुपये दर देणे बंधनकारक आहे; पण परवडत नसल्याने संघांनी दोनपासून चार रुपयांपर्यंत दरात कपात केली. त्याचे पडसाद राज्यभर उमटले, विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांनी दरकपात करणाºया संघाच्या व्यवस्थापनाला नोटिसा पाठविल्या आहेत. याविरोधात संघांनी सरकारकडे दाद मागितली असून समिती नेमली आहे. सरकारच्या पातळीवर पावडरबाबत फारसा निर्णय होईल, असे अपेक्षित नसल्याने दूध संघ हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संघांनी गाय दूध खरेदी दरात पुन्हा कपात करण्यास सुरुवात केली आहे.
सोनाई दूध संघ, इंदापूर आठवड्यात दुसºयांदा दरकपात केली आहे. ‘सोनाई’ दूध संघाचे रोज २२ लाख लिटर गाय दुधाचे संकलन आहे. त्यांनी ११ नोव्हेंबरपासून ३.५ फॅटला २० रुपये ५० पैसे दर केला आहे.
संघ प्रतिलिटर दूध
दर रुपयात
सोनाई, इंदापूर २०.५०
महानंद, मुंबई २१.००
सोलापूर २१.५०
पुणे २२.००
बारामती २१.००
औरंगाबाद २२.००
कोयना २२.००
गोकुळ २५.००