गाय दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’
By admin | Published: January 14, 2017 12:41 AM2017-01-14T00:41:05+5:302017-01-14T00:41:05+5:30
दूध पावडर दरवाढीचा परिणाम : नाक मुरडणाऱ्या संघाचे उत्पादकांना साकडे
राजाराम लोंढे ल्ल कोल्हापूर
देशांतर्गत बाजारपेठेसह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरचे दर एकदम वाढल्याने गाय दुधाची मागणी वाढली आहे. सध्या २२० रुपये किलो पावडर तर ३५० किलो बटरचे दर आहेत. त्यामुळे एरव्ही गाय दूध म्हटले की, नाक मुरडणाऱ्या संघांनी दरवाढीच्या माध्यमातून उत्पादकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केल्याने गाय दूध उत्पादकांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
बहुतांश गाय दुधाची पावडर केली जाते. यामध्ये खासगी दूध संघ आघाडीवर आहेत. पावडरचे दर अस्थिर असल्याने गायीच्या दुधाला त्या प्रमाणातच मागणी व दर असतो. गेले वर्षभर पावडरचे दर घसरल्याने संघ अडचणीत आले. अनेकांनी गायीचे दूध स्वीकारणे बंद करून पावडर प्लॅँट बंद केले.
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास गेले दहा वर्षांत गाय दूध झपाट्याने वाढू लागले आहे. म्हशीचा भाकड काळ जास्त असल्याने शेतकरी गायीकडे वळले आहेत. मध्यंतरीच्या काळात दूध संघांनीही प्रोत्साहन दिल्याने गाय दुध संकलनात वाढ झाली. ‘गोकुळ’चा विचार केला तर एकूण संकलनाच्या निम्मे दूध गायीचे आहे. दूध जास्त झाल्याने ‘गोकुळ’ने म्हैस दूध उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना आवाहन करत म्हैस दूधाला दोन रुपये तर गायीला रुपया वाढ देण्याचा निर्णय घेतल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. म्हशीपेक्षा गायीचे दर जास्त आहेत, मात्र दुधाला दर कमी व पशुखाद्य म्हशीपेक्षा अधिक लागत असल्याने उत्पादनखर्च आवाक्याबाहेर गेला आहे. म्हशीच्या तुलनेत गाय दुधाला लिटर मागे पंधरा रुपये कमी मिळतात. डिसेंबर-जानेवारीमध्ये दुधाचे उत्पादन वाढते, पण यंदा तुलनेने कमी असून पावडरसाठी दूध उपलब्ध झाले नाही. त्यातच दूध पावडरचे दर २२० रुपये तर बटरचे दर ३५० रुपये किलोपर्यंत गेल्याने संघांना आता गाय दुधाची गरज वाटत आहे. महिन्यात दोनवेळा गाय दुधाची दरवाढ झाली आहे.
बक्षिसाच्या रकमेत दुजाभाव!
वास्तविक दूध संघासमोर दूध उत्पादक हा सारखाच असायला हवा. मार्केट पॉलिसी म्हणून दरातील तफावत उत्पादकांना मान्य आहे; पण स्पर्धेसाठी गाय व म्हैस दूध उत्पादकाला तेवढेच कष्ट पडतात, त्यामध्ये दुजाभाव असणे योग्य नाही. यावर्षीपासून ‘गोकुळ श्री’ स्पर्धेच्या बक्षिसात गायीच्या तुलनेत म्हैस उत्पादकाला पाच हजार रुपये जादा रक्कम देण्याचा निर्णय घेतला.