गाय दूध खरेदी दरात दोन रुपयांची वाढ
By admin | Published: June 20, 2017 01:13 AM2017-06-20T01:13:10+5:302017-06-20T01:13:10+5:30
‘गोकुळ’चा निर्णय : आजपासून अंमलबजावणी; म्हैस दूध दर ‘जैसे थे’
लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने गाय व म्हैस खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे आदेश दिले असले तरी ‘गोकुळ’चा म्हैस दूध दर शासनापेक्षा ३ रुपये ४० पैसे जास्त आहे. त्यामुळे केवळ गाय दूध खरेदी दरात वाढ केली जाणार आहे.
शेतकरी संघटनांनी कर्जमाफीसह दूध दरवाढ करण्याची मागणी करत आंदोलन केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी संघटना प्रतिनिधींशी चर्चा करताना २० जूनपूर्वी दूध दरवाढीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. दूध दरवाढीसाठी समिती नेमली होती, या समितीची १५ जूनला बैठक होऊन गाय व म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपये वाढीची सूचना केली होती. त्यानुसार सोमवारी राज्य सरकारने दरवाढीबाबत आदेश काढला. उत्पादकांना ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणप्रतीच्या गाय दूध खरेदी दरात तीन रुपयांची वाढ केली. सध्या या प्रतीच्या दुधासाठी २४ रुपये दर आहेत त्यात वाढ करून २७ रुपये द्यावा व येथून ३.६ ते ५.० प्रतिपॉर्इंट वाढीव फॅटसाठी ३० पैसे इतकी वाढ देण्याचे आदेश दिले आहेत. म्हशीच्या ६.० फॅट व ९.० एसएनएफ गुणप्रतीच्या दुधाला तीन रुपयांची वाढ करावी, सध्या ३३ रुपये दर असून तो ३६ रुपये प्रतिलिटर द्यावा. त्याचबरोबर ६.१ ते ७.५ पर्यंत वाढीव फॅटसाठी ३० पैसे वाढ कायम ठेवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.
‘गोकुळ’सध्या म्हैस दुधाला ६.० फॅट व ९.० एसएनएफला ३६ रुपये ४० पैसे तर गाय दूध ३.५ फॅट व ८.५एसएनएफसाठी २५ रुपये प्रतिलिटर दर देते. सरकारच्या दरापेक्षा ‘गोकुळ’चा म्हैस दर तीन रुपये वाढ देऊनही ४० पैसे जादाच आहे. त्यामुळे गाय दुधात वाढ केली आहे.
सरकारच्या दरापेक्षा ‘गोकुळ’चा म्हैस दर जादा असल्याने केवळ गायीच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; पण विक्री दरात कोणतीही वाढ केली जाणार नाही.
- विश्वास पाटील
(अध्यक्ष, गोकुळ)