दोन्ही काँग्रेससह ‘माकप’ची निदर्शने
By admin | Published: January 10, 2017 12:40 AM2017-01-10T00:40:22+5:302017-01-10T00:40:22+5:30
नोटाबंदीविरोधात इचलकरंजीत निषेध : मलाबादे चौकात सरकारविरोधी घोषणा
इचलकरंजी : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात सोमवारी शहरातील राष्ट्रवादी कॉँग्रेस, राष्ट्रीय युवक कॉँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यावतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली. राष्ट्रवादी कॉँग्रेसने भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रासमोर म्हशी उभ्या केल्या. राष्ट्रीय युवक कॉँग्रेसने प्रांताधिकारी कार्यालयासमोर घंटानाद केला, तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मलाबादे चौकात निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदविला.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजीनगर येथील शहर कार्यालयात जमले. त्यांनी तेथून मोटारसायकल रॅली काढली व हे सर्वजण चांदणी चौकातील भारतीय स्टेट बॅँकेच्या एटीएम केंद्रासमोर आले. ५० दिवस उलटले तरी बॅँका व एटीएम केंद्रांमध्ये चलनी नोटांची टंचाई भासत असल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी एटीएम केंद्रासमोर म्हशी उभ्या करून आगळेवेगळे आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सरचिटणीस मदन कारंडे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील, उदयसिंह पाटील, सचिन हुक्किरे, प्रधान माळी, बाळासाहेब देशमुख, आदी सुमारे २०० कार्यकर्त्यांनी भाग घेतला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.
राष्ट्रीय युवक कॉँग्रेसचे कार्यकर्ते बंगला रोडवरील कॉँग्रेसच्या शहर कार्यालत जमले. तेथून ते प्रांत कार्यालयातील चौकात मिरवणुकीने गेले. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या विरोधात आणि काळा पैसा बाहेर काढण्याची मोहीम असल्याबद्दल घंटानाद करीत कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला. आंदोलनामध्ये अमृत भोसले, राजू बोंद्रे, बाळासाहेब माने, अनिल म्हालदार, प्रणव होगाडे, नजमा शेख, सुरेखा काटकर, आदींनी भाग घेतला. त्यानंतर प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार मनोज ऐतवडे यांना निवेदन देण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कामगार नेते दत्ता माने, शहर सचिव आनंदराव चव्हाण, आदींच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते मलाबादे चौकात एकत्र आले. त्यांनी चलनी नोटा बंद केल्याचा परिणाम कामगार, कष्टकरी जनतेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. एक प्रकारची आर्थिक आणीबाणी उद्भवली असल्याबद्दल टीका केली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्वीस बॅँकेतून काळा पैसा आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध नोंदविला. त्यानंतर चव्हाण, माने, शिवगोंड खोत, ए. बी. पाटील, सदा मलाबादे, भाऊसाहेब कसबे, भाऊसाहेब सूर्यवंशी, बाळनाथ रावळ, सुभाष कांबळे, आदींच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. (प्रतिनिधी)