माकपचे शुक्रवारी ‘जवाब दो’ आंदोलन
By Admin | Published: May 18, 2015 11:43 PM2015-05-18T23:43:08+5:302015-05-19T00:22:34+5:30
भाजपच्या आश्वासनांचा होणार ‘पोलखोल’
कोल्हापूर : कोल्हापुरातला टोल रद्द करण्याची घोषणा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत येण्यापूर्वी केली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा याच फडणवीसांनी मागितला होता पण आजही कोल्हापुरातील टोल रद्द झाला नाही. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांचे मारेकरी तीन महिन्यांनंतरही सापडलेले नाहीत. कोल्हापूरकरांच्या या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अपयशी ठरलेल्या फडणवीस सरकारकडे जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे (माकप) कोल्हापुरात शुक्रवारी (दि. २२) भाजप सरकारविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माकपचे जिल्हा सचिव उदय नारकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
नारकर म्हणाले, कोल्हापुरातील टोल रद्द करण्यात आणि पानसरेंच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी काळा पैसा देशात आणण्याचे, महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते, पण सत्तेत येऊन वर्ष झाले तरी या देशात काळा पैसा आलेला नाही. महागाई दिवसें-दिवस वाढतच आहे. भूसंपादनाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. औषधे महागली आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल - डिझेलचे दर कमी असले तरी देशातील पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. जाती-धर्मातील तेढ निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘जवाब दो आंदोलन’ होणार आहे. या आंदोलनादरम्यान दसरा चौक ते मिरजकर तिकटी या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मिरजकर तिकटी येथे जाहीर सभाही होणार आहे.
माकपचे जिल्हा समिती सदस्य चंद्रकांत यादव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात अन्नधान्याचे दर वाढत आहेत. कामगारांनी संघर्ष करून मिळवलेले कायदे बदललेले जात आहेत. विकासाच्या नावाखाली कॉर्पोरट विकासाला प्राधान्य दिले जात असून कामगार, शेतकरी, शासकीय योजनांत काम करणारे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेशन व्यवस्थाच बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. शासनाचे हे धोरण कामगार, गरीब आणि शेतकरी यांना मारक आहे.
यावेळी प्राचार्य ए. बी. पाटील, अॅड. जयंत बलुगडे, प्रा. आबासाहेब चौगले, शंकर काटाळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
टोल रद्द करून मते मिळवलीत, टोल कधी रद्द होणार ?
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला तीन महिने झाले. पानसरेंच्या खुन्यांना कधी पकडणार?
दाभोलकरांच्या खुन्यांना कधी पकडणार?
ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे दर का देत नाही?
गोवंश हत्याबंदी कायदा करून कोणाला खूश करत आहात?
एक वर्षात किती काळा पैसा देशात आणला?
डिझेल-पेट्रोलचे भाव का वाढवले जात आहेत?
महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन महागाई का कमी केली नाही?